जळगाव : दोन अल्पवयीन चुलत बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राज संतोष कोळी (वय १९, रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव) याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांनी बुधवारी हा निकाल दिला. या घटनेतील दोन्ही पीडित बहिणींनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची खडानखडा माहिती न्यायाधीशांना दिली.
राज कोळी याने २० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता अनुक्रमे ६ व ७ वर्षे वय असलेल्या दोन्ही चुलत बहिणींना आपल्या घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने दोघींशी लैंगिक अत्याचार केला. दोन्ही बहिणींनी झालेला प्रकार आईला सांगितला असता घटनेला वाचा फुटली होती.
कलमनिहाय शिक्षाकलम ३७६ एबीनुसार २० वर्षे सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंड, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम ४ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, तर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.