लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मिल्लत नगर आणि शिव कॉलनी येथे भुयारी मार्ग बांधण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दिशाभूल करत असल्याचा आरोप करत मिल्लत नगर परिसरातील नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.
शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ६१ कोटी रुपयांत देण्यात आले होते. त्याला चेंज ऑफ स्कोपनुसार ६ कोटींच्या अतिरिक्त कामाची तरतूद देण्यात आली होती. मूळ कामाच्या निविदेत शिव कॉलनी, मिल्लत नगर, अग्रवाल चौक या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाच्या कामाचा समावेश करण्यात आला नव्हता. ही कामे या सहा कोटींच्या रकमेत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रादेशिक कार्यालयाकडे या कामांसाठी १३ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मिल्लत नगर, सालार नगर या भागात शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे तेथे अनेक विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे येथे भुयारी मार्ग करण्याची गरज असल्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी समांतर रस्ते कृती समितीचे फारुक शेख, निवेदिता ताठे, प्रतिभा शिरसाठ, बाबा देशमुख ,जळगाव जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे अध्यक्ष मझर पठाण, शिवसेनेचे महानगराध्यक्ष जाकिर पठाण, एमआयएमचे माजी समन्वयक बशीर बुऱ्हानी, जळगाव शहर काँग्रेसचे नदीम काझी, नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, फारुक शेख, इम्रान शेख, अब्दुल नदीम अहमद, नबील साबीर शेख, झाहिद शाह उपस्थित होते.
सेकंड फेजचे आमिष
या वेळी आंदोलक आणि प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांच्यात झालेल्या चर्चेत सिन्हा यांनी भुयारी मार्ग आणि खोटे नगर ते पाळधी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सेंकड फेजमध्ये करण्याचे सांगितले असल्याचे फारुक शेख यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे; मात्र त्यासाठी अजून प्राथमिक तयारीदेखील नाही. त्यामुळे तोपर्यंत आणखी किती जणांचे बळी घेणार, असा प्रश्न देखील शेख यांनी उपस्थित केला आहे.
फोटो कॅप्शन - प्रकल्प संचालक सिन्हा यांना निवेदन देताना प्रतिभा शिरसाठ, निवेदिता ताठे, फारुक शेख सोबत जमील देशपांडे आणि इतर. (१३ सीटीआर ३३)