जळगाव,दि.30- कालीपीलीचा चालक बनून साडे सहा लाख रुपये किमतीचे मोबाईलचे पार्सल व त्याचे भाडे स्विकारणारा आतिष करणसिंग पाटील (वय 34रा.एस.टी.कॉलनी, जळगाव) हाच चोरटा निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणून आतिषसह त्याचा साथीदार प्रल्हाद शांताराम चौधरी (रा.नशिराबाद) या दोघांना अटक केली आहे.
अरविंद कन्हैयालाल हसवाणी (वय 55 रा.सिंधी कॉलनी) यांचे फुले मार्केटला शहर पोलीस स्टेशनच्या समोर दिशरिमा कम्युनिकेशन नावाचे मोबाईल विक्रीचे होलसेल दुकान आहे. भुसावळ येथील ऑर्डर आल्याने हसवाणी यांनी शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता दुकानातील कामगार जाहीद खान याच्याजवळ 5 प्रकारचे 6 लाख 37 हजार 600 रुपये किमतीचे 48 मोबाईल असलेले पार्सल भुसावळ येथे पाठविण्यासाठी दिले. खान हा हे पार्सल घेऊन अजिंठा चौकात गेला असता तेथे एका कालीपीलीजवळ (क्र.एम.एच.19 बी.जे.1041) थांबलेल्या आतिष पाटील याच्याजवळ दिले होते.