आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडची लागण झाल्यानंतर सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यांची जिल्हाभराची स्थिती बघितली असता जिल्ह्यात या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत साडे सहा ते ७ हजारापर्यंत रुग्ण हे घरच्या घरी योग्य औषधोपचार घेऊन बरे झाले आहेत.
योग्य काळजी, वेळेवर निदान आणि वैद्यकीय सल्ला यामुळे कोरोनावर मात करता येऊ शकते, हे या आकडेवारीवरून समोर येत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कमी कालावधीत अधिक रुग्ण व अधिक मृत्यू झाले आहेत. त्यात यंत्रणेवरील ताण मध्यंतरी प्रचंड वाढल्याने रुग्णांची फिरफिरही मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, आता ही दुसरी लाट ओसरू लागली असून सर्वच ठिकाणचा संसर्ग कमी झाला आहे. मात्र, पहिल्या लाटेत जेव्हा यंत्रणेत पुरेशी व्यवस्था नव्हती, अशा वेळी लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांना गृहविलगीकरणाचा पर्याय प्रशासनाने साधारण जून महिन्याच्या आसपास उपलब्ध करून दिला होता.
निकष कडक केल्याने काहीशी बंधने
यात काही निकषही लावण्यात आले होते. यात रुग्ण ६० वर्षापेक्षा अधिक वयाचा नसावा, त्याला अन्य व्याधी नसाव्यात, त्यांनी खासगी डॉक्टरांची परवानगी घ्यावी, घरात सर्व स्वतंत्र व्यवस्था असावी, लक्षणे विरहित किंवा अगदी सौम्य लक्षणे असली तरच अशा रुग्णांना ही परवानगी दिली जात होती. मध्यंतरी हे निकष अधिकच कडक करण्यात आले होते. त्यामुळे संसर्गावर काहीशी बंधने आली.
ही घ्या काळजी
- दररोज मास्क बदलवा
- दिवसातून अधूनमधून हात स्वच्छ धुवा
- साधारण १५ दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये
-दर सहा तासांनी ऑक्सिजनची पातळी मोजावी
- लिंबूवर्गीय फळे व पाैष्टिक आहाराचे सेवन करावे, मानसिक स्वास्थ उत्तम राहावे...
अशी कमी झाली संख्या
१५ मे - ७,००४
३१ मे - ४,४५०
१५ जून - १,८२९
२७ जून - ४४७
५७ टक्के रुग्ण घरीच
जिल्ह्यातील सद्यस्थितीतील सक्रिय रुग्णांपैकी ५७ टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत आहे. सध्या जिल्ह्यात ७७२ रुग्ण असून त्यापैकी ४४७ रुग्ण हे गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.