जळगाव : जिल्हाभरात गेल्यावर्षी सहा एचआयव्ही पॉझिटिव्ह महिला आढळल्या आहेत. गरोदर अवस्थेत करण्यात आलेल्या उपचारानंतर या महिलांनी निगेटिव्ह बाळांना जन्म दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून शासनातर्फे विविध माध्यमातून करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे एड्स बांधितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटल्याचे जिल्हा आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे गरोदर असलेल्या प्रत्येक महिलेची ‘ॲन्टी रेट्रो व्हायरल’ ही तपासणी केली जाते. या तपासणीत महिला एड्स पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधित महिलेचे बाळ निगेटिव्ह जन्माला येण्यासाठी उपचार पद्धतीला सुरूवात करण्यात येते. ही उपचार पद्धती यशस्वी झाल्यावर संबंधित महिला या निगेटिव्ह बाळाला जन्म देतात. जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे गेल्यावर्षी प्रसुतीसाठी आलेल्या २ हजार ४१ महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सहा महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. यात जळगाव शहरातील २ महिला, भुसावळ येथील १, पारोळा १, एरंडोल १ व धरणगाव येथील एका महिलेचा समावेश आहे. या सहाही महिलांनी योग्य उपचारानंतर निगेटिव्ह बाळांना जन्म दिला असून, या बाळांची तब्येत सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
जनजागृतीमुळे बाधितांच्या प्रमाणात घट
गेल्या दहा ते पंधरा वर्षांत शासनातर्फे एड्सच्या बाबतीत शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. याचा परिणाम बाधितांच्या प्रमाणात घट होण्यात झाल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. यामध्ये २०१७मध्ये ४ हजार ९११ महिलांमागे ७ महिला पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या. २०१८मध्ये ४ हजार ६६० महिलांमधून १२ महिला पॉझिटिव्ह, २०१९मध्ये ५ हजार ५४५ महिलांमध्ये १५ महिला पॉझिटिव्ह तर २०२०मध्ये ८०८ महिलांमध्ये ६ महिला पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.
इन्फो :
गरोदर महिलांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपचार घ्यावे
गरोदर महिलांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या बाळाला याची लागण होऊ नये, यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एआरटीची औषधे व इतर औषधी घ्याव्यात. या उपचार पद्धतीत खंड पडता कामा नये, ही मुख्यत्वे काळजी घ्यावी.
इन्फो :
सध्या सहा महिला बाधित
जिल्ह्यात सध्या सहा महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्या असून, या महिलांची नुकतीच प्रसुती झाली आहे. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली या महिलांवर व त्यांच्या बाळांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे या महिलांचे बाळ एचआयव्ही निगेटिव्ह आहे.
इन्फो :
गेल्या काही वर्षांत एड्सबाबत शासनातर्फे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या जनजागृतीमुळे एड्सचे प्रमाण कमी झाले आहे. भविष्यात हे प्रमाण आणखी कमी होईल. तसेच डॉक्टरांच्या सूचनेनुसार एचआयव्ही बाधित महिलांनी योग्य उपचार पद्धती घेतल्यास, त्या निगेटिव्ह बाळाला जन्म देऊ शकतात.
- डॉ. संजय बनसोडे, विभागप्रमुख - स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभाग,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, जळगाव