लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/नांदेड : राज्याच्या काही भागांत पाऊस आणि गारपिटीची मालिका सुरूच आहे. बुधवारी वीज पडून सहा जणांचा बळी गेला. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात गारपीट झाली. तर मराठवाड्याच्या काही भागात वळिवाने हजेरी लावली.
जामनेर (जि. जळगाव) येथे बुधवारी सकाळपासून कडक ऊन पडले असताना दुपारी २:४५ वाजेच्या सुमारास वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. हिवरखेडे, मांडवे बुद्रुक, चिंचखेडे बुद्रुक येथे गारांसह पाऊस झाला. भुसावळातही वादळी पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी येथे दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला.
परभणीत दोघे दगावले
परभणी जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जिंतूर व पूर्णा तालुक्यातील पांगरी, सारंगी शिवारात ही दुर्घटना घडली.
नगरमध्ये चौघांचा मृत्यू
अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला वळवाच्या पावसाने सायंकाळी जोरदार झोडपून काढले. यामध्ये नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. हे सर्व जण शेतात काम करीत होते.