चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील चंपावती नदीवर जलसंधारण व मृदा संधारण विभागातर्फे ५६ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्याला भिंतींमधूनच गळती लागली आहे.जलसिंचनासह जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, या उद्देशाने हा बंधारा बांधला होता. मात्र, निकृष्ट कामाने त्याचा उपयोग होत नसल्याचे दिसते. नदी पुनरुज्जीवन अंतर्गत तालुक्यात चहार्डी येथील चंपावती (चहार्डी-अकुलखेडा २) नदीवर सिमेंट साठवण बंधारा गेल्या सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आला. बांधकामासाठी तापी नदीची वाळू न वापरता याच नदीतील माती मिश्रीत वाळू वापरण्यात आल्याने या बंधाºयाला गळती लागली आहे. बंधाºयासाठी खर्च झालेले ५६.१७ लाख रुपये पाण्यात जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.याच नदीवर असाच आणि एवढ्याच खर्चाचा दुसरा बंधाराही अकुलखेडा शिवारात बांधण्यात आला आहे. बांधकामावेळी तापी नदीवरील वाळू लिलाव झालेला नव्हता. त्यामुळे कंत्राटदाराने याच नदीतील माती मिश्रीत वाळू वापरली. यामुळेच बंधाºयाला गळती लागली, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.या बंधाºयात यावर्षी पाऊस चांगला झाल्याने व अकुलखेडा येथे हतनूर कालव्याचे आऊटलेट असल्याने हतनूर धरणातून थेट कालव्याद्वारे या नदीत पाणी सोडले जाते. म्हणून पाणी चांगले अडविले गेले असते तर सिंचन होऊन भूगर्भातील पातळी वाढली असती. मात्र आता अडविलेले पाणी गळतीतून वाहून जात असल्याचे दिसत आहे.गेल्या वर्षापर्यंत चहार्डी आणि परिसरातील गावांना भीषण पाणी टंचाई सहन करावी लागली होती. टंचाई निवारण्यासाठी या दोन्ही बंधाऱ्यांमधील अडविलेले पाणी उपयोगात आले असते. त्यामुळे हा बंधारा दुरुस्त होणे गरजेचे आहे.