जळगाव : कोजागरी पौर्णिमेनिमित्त दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढून शनिवार व रविवार असे दोन दिवसात जिल्हा दूध संघातून तब्बल सहा लिटर दुधाची विक्री झाली. नेहमीपेक्षा दीडपटीने जादा मागणी राहिल्याची माहिती दूध संघाच्यावतीने सांगण्यात आले.कोजागरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमेला दूध आटवून ते प्रसाद म्हणून रात्री चंद्राला दाखविले जाते व त्यानंतर ते प्राशन करतात. त्यासाठी दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. त्या पार्श्वभूमीवर दूध संघासह खाजगी डेअरी चालकांकडून नियोजन करण्यात येते.त्यानुसार यंदाही जिल्हा दूध संघाच्यावतीने अतिरक्त दुधाचा साठा करण्यात आला. तसेच खाजगी डेअरी चालकांनीही जादा दुधाची मागणी केली होती. दरवर्षापेक्षा यंदा तर दुधाची मागणी अधिकच वाढली. दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला साधारण चार लाख लिटर दुधाची विक्री होते. मात्र यंदा ही विक्री दीडपटीने वाढून सहा लिटर दुधाची विक्री झाली.एरव्ही दररोज जिल्हा दूध संघाकडून दोन लाख लिटरचा पुरवठा होतो. मात्र कोजागरीसाठी शनिवारी तीन लाख लिटर व रविवारीदेखील तीन लाख लिटर असे एकूण सहा लाख लिटर दुधाची कोजागरी पौर्णिमेसाठी विक्री झाली.खाजगी डेअरीवरदेखील तीनपट दुधाची विक्रीएरव्ही खाजगी डेअरीवरून दररोज सरासरी एक हजार लिटर दुधाची विक्री होते. मात्र कोजागरी पौर्णिमेनिमित्त डेअरी चालकांनी तीन हजार लिटर दुधाची अतिरिक्त मागणी केली होती व तेवढी विक्रीदेखील झाल्याचे सांगण्यात आले.लक्ष्मी-इंद्र देवतेच्या पूजनासह ज्येष्ठ अपत्याचे औक्षणकोजागरी पौर्णिमेला रात्री लक्ष्मी तसेच इंद्र देवतेचे पूजन करण्याचा प्रघात आहे. या सोबतच ज्येष्ठ अपत्याचे औक्षणदेखील करण्यात येते. मातीचे दिवे करून व समोर गव्हाची मांडणी करून हे औक्षण केले जाते. त्यानुसार रविवारी घरोघरी दूध आटविण्यासह हे पूजनही करण्यात आले.भुलाबाईला निरोप‘भाद्रपदेचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला...’ असे म्हणत अनेक घरी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलेल्या भुलाबाईला अश्विन पौर्णिमेला निरोप देण्यात आला. यासाठी मुलींनी विविध खाऊ करून व एकत्र येत भुलाबाईचे गाणे गात भुलाबाईचे पूजन केले. त्यानंतर आटविलेल्या दुधाचा व भुलाबाईच्या खाऊचा सर्वांनी आस्वाद घेतला. अनेक ठिकाणी रहिवाशांनी एकत्र येत अंगणात तर कोठे घराच्या गच्चीवर विविध खाद्य पदार्थ करून एकत्र जेवणाचा आनंद घेतला.
जळगावात कोजागरी पौर्णिमेला सहा लाख लिटर दूध फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:47 AM