लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागरिकांकडून कोरोनासंबधीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. यासाठी खुद्द जिल्हाधिकारी अभिजित राऊत ॲक्शन मध्ये आले असून, रविवारी शहरातील ५० पेक्षा अधिक वऱ्हाडी असलेल्या दरम्यान नियमांची पायमल्ली करणारी सहा मंगल कार्यालय व लॉन्स सील करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सहाही मंगल कार्यालयांचे मालक व आयोजकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नेतृत्वाखाली महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे व पोलीस प्रशासनाने रविवारी सकाळपासून संयुक्त कारवाई करीत दापोरे मंगल कार्यालय, पिंप्राळा रोड वरील यश लॉन, लाडवंजारी मंगल कार्यालय, कमल पॅराडाईज, क्रेझी होम व मिराई लॉन्स वर कारवाई केली आहे. या सहाही ठिकाणी वऱ्हाडींची संख्या ५० पेक्षा अधिक होती. यामध्ये पुराव्यानिशी सहाही मंगल कार्यालय व लॉन्स वर कारवाई करण्यात आली.
बड्या लोकप्रतिनिधींसह नगरसेवकांचीही हजेरी
महापालिका व जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईदरम्यान काही लॉन्स वरील लग्नसमारंभात शहरातील काही बड्या लोकप्रतिनिधींसह काही नगरसेवकांनी देखील उपस्थिती होती. काही लोकप्रतिनिधींनी ही कारवाई होऊ नये म्हणून मनपा उपायुक्त व काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना फोन करीत दबावतंत्राचा वापर केला. मात्र जिल्हा प्रशासनाने हा दबाव झुगारून ६ मंगल कार्यालयांवर कारवाई करत सील केले आहेत.
५०० ते ८०० लोकांचा सहभाग
कोरोना रुग्णांची संख्या शहरात एकीकडे झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे नागरिकांकडून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. रविवारी देखील शहरात झालेल्या विविध ठिकाणचा लग्नसमारंभात ही पायमल्ली आढळून आली. अनेक लग्न समारंभामध्ये ५०० ते ८०० नागरिकांपर्यंत संख्या आढळून आले. मनपा प्रशासनाने सुरुवातीला लग्न समारंभा मधील गर्दीचे व्हिडिओ चित्रण करून पुरावे जमा केले. त्यानंतरच मंगल कार्यालय चालक व आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कारवाई होताच सुरू झाली पळापळ
मनपा, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून अचानक केलेल्या कारवाईमुळे लग्नसमारंभातील नागरिकांनी पळापळ सुरू केल्याचे चित्र या कारवाई दरम्यान दिसून आले. कमल पॅराडाईज मध्ये शहरातील अनेक नामवंत नागरिकांनी देखील हजेरी लावली होती. तसेच इतर मंगल कार्यालय व लग्न समारंभामध्ये नगरसेवक काही पक्षातील मान्यवरांनी देखील हजेरी लावली होती. या दरम्यान काही वेळ पळापळ झाली.