जळगाव : शासनाने दिलेल्या विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने यावल तालुक्यातील कासवा ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले. तक्रारदार मंगला विनोद तायडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावर हा निर्णय दिला. कासवा ग्रामपंचायतीतील सातपैकी सहा सदस्य अपात्र झाले आहे.सुधाकर रामा कोळी, दशरथ अर्जुन सपकाळे, आशा शंकर सपकाळे यांनी एसटीचे तर सविता प्रशांत साळवे यांनी एससीचे तर संगीता जयेश कोळी, कल्पना प्रकाश सपकाळे यांनी ओबीसीचे प्रमाणपत्र सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली. सदस्य पुनम गोपाळ तायडे यांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांचे पद कायम राहिले आहे.२०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत हे सदस्य निवडून आले होते. यानंतर वर्षभरापर्यत मुदत देवूनही जात प्रमाणपत्र ते सादर करु शकले नव्हते. अखेर पंचवार्षीक कार्यभार समाप्त होण्याच्या वर्षभर आधीच ही कारवाई झाली. यामुळे तेथे पुन्हा निवडणुका घेतल्या जाणार आहे.आचलगाव सरपंच अविश्वास कायमभडगाव तालुक्यातील आचलगाव येथील सरपंच गोरख मधुकर पाटील यांच्या विरुद्ध १० सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. यानंतर त्यांचा २४ डिसेंबर २०१८ मध्ये राजीनामा घेतला होता. दरम्यान सुनावणी वेळी त्यांनी आपण निरक्षर असून दिशाभूल करुन राजीनाम्यावर सही घेतल्याचा दावा गोरख पाटील यांनी केला होता. यावर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी निरक्षर व्यक्ती सरपंच पदावर कसे काम करू शकेल, असे सांगत अविश्वास ठराव कायम केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे वकील हारुन देवरे यांनी दिली.
यावल तालुक्यातील कासवा ग्रामपंचायतचे सहा सदस्य अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:22 PM