लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपा शिक्षण मंडळात अंतर्गत कार्यरत असलेल्या १५२ शिक्षकांचे, तर ४६५ सेवानिवृत्त शिक्षकांचे गेल्या सहा महिन्यांपासून थकीत वेतन अखेर खात्यात जमा झाले असून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिक्षक व सेवानिवृत्तांना दिलासा मिळाला आहे. यापुढेही नियमित वेतन केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळांतर्गत १५२ शिक्षक, तर ४६५ सेवानिवृत्तांसह ३ शिक्षकेतर कर्मचारी आणि २२ सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. या शिक्षक व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी शासन पन्नास टक्के अनुदान देते, तर पन्नास टक्के निधी हा महानगरपालिका शिक्षण मंडळाला देत असते; परंतु गेल्या ६ महिन्यांपासून मनपाने पन्नास टक्के वेतन थकविले होते. त्यात कोरोनाने भर घातल्यामुळे शिक्षक व सेवानिवृत्त आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यामुळे नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाचे पाटील, गंगाराम फेगडे, किशोर रोटे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन शिक्षकांची व्यथा मांडली होती.
थकीत वेतन केले अदा...
दरम्यान, एकूण थकीत रकमेपैकी अखेर मनपाने नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ पर्यंतच्या थकीत वेतनाची ५ कोटी ३१ लाख ९९ हजार २१० रुपयांची रक्कम मनपा शिक्षण मंडळाला नुकतीच अदा केली आहे. त्यानुसार सहा महिन्यांची थकीत वेतनाची रक्कम शिक्षक, सेवानिवृत्तांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे.
नियमित वेतनाचे आश्वासन
नेहमी मनपाकडून मनपा शिक्षक व सेवानिवृत्तांचे अनेक महिन्यांचे वेतन थकविले जाते. रखडलेले वेतन मिळावे यासाठी शिक्षक व सेवानिवृत्तांकडून वारंवार मनपा प्रशासनाला निवेदने दिली जातात. काही वेळा आंदोलनाचे शस्त्रसुद्धा सेवानिवृत्तांना उचलावे लागते. दरम्यान, आता मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांचे सुद्धा नियमित वेतन केले जाईल, असे आश्वासन मनपाकडून देण्यात आले असल्याची माहिती नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आली आहे.
- शिक्षकांच्या वेतनाची मिळालेली थकीत रक्कम
नोव्हेंबर २०२० - ४५१९६७२
डिसेंबर २०२० - ३६६९४१३
जानेवारी २०२१ - ४७५११९४
फेब्रुवारी २०२१ -३६६७४८६
मार्च २०२१ -३६५०३४९
एप्रिल २०२१ - ३७१२२३९
०००००००००००
-सेवानिवृत्तांच्या वेतनाची मिळालेली थकीत रक्कम
नोव्हेंबर २०२० -४९०९५३५
डिसेंबर २०२० -४७८७४०६
जानेवारी २०२१ -५४७७२८५
फेब्रुवारी २०२१- ४६७४८४६
मार्च २०२१ -४७१२८४८
एप्रिल २०२१ -४६६६९३८