जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून सोमवार, २८ डिसेंबर रोजी नऊ महिने होत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने दिलासा असला, तरी मध्यंतरीचे सहा महिने हे जिल्हावासीयांसाठी प्रचंड दहशतीचे गेल्याचे चित्र आहे. या सहा महिन्यांची तुलना केली असता सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्णवाढ समोर आली. जिल्ह्यातील १.२९ टक्के जनता कोरोनाबाधित झाली आहे.
१३ जुलैपासून जिल्ह्यात नव्या पद्धतीच्या ॲण्टीजेन चाचण्यांना प्रथमच सुरुवात झाली, तेव्हापासून चाचण्यांचे प्रमाण वाढले आणि रुग्णांच्या मनातील क्वारंटाइनचे टेन्शन मिटले. अहवाल अगदीच १५ मिनिटांत मिळत असल्याने याच चाचण्यांची मागणी होऊ लागली. बघताबघता या चाचण्या आरटीपीसीआरपेक्षा अधिक झाल्या आणि रुग्ण समोर आले. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. मृतांची संख्या कमी झाली. दोन महिन्यांत ५२ रुग्णांचा मृत्यू झाला.
अन् जिल्हा हादरला
मुंबईहून प्रवास करून आलेले मेहरूण येथील रहिवासी यांना लक्षणे जाणवायला लागली. त्यांनी काही दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोविड रुग्णालयात स्वॅब दिले व दाखल झाले. २८ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आणि जिल्ह्यात कोरोनाने धडक दिल्याचे कानांवर पडताच जिल्हा हादरला. ही वार्ता सर्वदूर वाऱ्यासारखी पसरली. पहिला रुग्ण १४ दिवसांनी सुखरूप बरा होऊन घरी परतला.
१८ दिवस होता दिलासा
पहिला रुग्ण सापडून १८ दिवस उलटले होते. एकही रुग्ण समोर आलेला नव्हता. मात्र, अचानक अमळनेरातील मुंगसे येथील एका ६० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर मात्र अमळनेर, भुसावळात कोरोनाचा उद्रेक झाला आणि अगदीच झपाट्याने रुग्ण समोर येऊ लागले. ही संख्या वाढतवाढत एका दिवसाला थेट एक हजार रुग्ण समोर येऊ लागले.
२१ लाख लोकांना झाला कोरोना?
जिल्ह्यातील ४३ लाख लोकसंख्येपैकी ५५,६२१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण १.२९ टक्के आहे. तर दुसऱ्या सिरो सर्व्हेत २६ टक्के लोकांमध्ये ॲण्टीबाॅडी आढळून आलेल्या होत्या. म्हणजेच, जिल्ह्यातील ११ लाखांपेक्षा अधिक जनतेला कोरोना होऊन गेला, असा त्याचा निष्कर्ष होता. विशेष बाब म्हणजे हा अहवाल दीड महिन्यांनी उशिरा आला होता. त्यामुळे २१ लाख जनता कोरोनाबाधित असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. अर्थात, ५० टक्के लोकांमध्ये ॲण्टीबाॅडी डेव्हलप झालेल्या आहे. पुन्हा एक सिरो सर्व्हे करण्यात आला.
१८ सप्टेंबरपासून कोरोना से..डरोना
एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत कोरोनाची दहशत कायम होती. मात्र, १८ सप्टेंबरपासून सातत्याने कोरोनाचे नवे रुग्ण कमी आणि बरे होणारे अधिक ही संख्या वाढतच गेली आणि अखेर कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे थेट ९७ टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. दुसऱ्या लाटेला जवळपास थोपविल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आव्हान कायम आहे.
नऊ महिन्यांतील हे आहेत मोठे आकडे
११८५ रुग्ण - ७ सप्टेंबर
२० मृत्यू - १२ सप्टेंबर
४९९५ चाचण्या - २१ ऑगस्ट
या ठरल्या महत्त्वाच्या तारखा
२८ मार्च : पहिला रुग्ण
६ जून : १००० चा टप्पा ओलांडला
२७ जुलै : १० हजारांचा टप्पा ओलांडला
७ ऑक्टोबर : ५० हजारांचा टप्पा ओलांडला
महिने आणि कोरोनाचे रुग्ण
मार्च - ०१
एप्रिल - ३६
मे - ७०३
जून -२८१०
जुलै- ७३७३
ऑगस्ट -१६२०३
सप्टेंबर -२००४८
ऑक्टोबर - ५०१३
नाेव्हेंबर - १३६८
डिसेंबर २७ पर्यंत - १०६०
महिनेनिहाय मृत्यू
एप्रिल -१०
मे- ७१
जून-१६३
जुलै- ३५५
ऑगस्ट-४५८
सप्टेंबर-३७१
ऑक्टोबर-८३
नोव्हेंबर-३२
डिसेंबर-२०
हे मृत्यू चिंता वाढविणारे
जिल्ह्यातील एक १४ वर्षीय बालिका, २४, २५, २७, ३० वर्षीय तरुण हे पाच मृत्यू जिल्ह्याची चिंता वाढविणारे ठरले. डॉक्टरांनी या मृत्यूचे विश्लेषण केले. त्यांच्या मतानुसार तरुणांनाही संसर्ग अधिक झाल्यास मृत्यूचा धोका असतोच. शिवाय, त्यांना अन्य काही व्याधी असल्यास मृत्यूचा धोका वाढतो, असे डॉक्टरांनी या मृत्यूनंतर स्पष्ट केले होते.
आता भीतीच नाही...
जिल्ह्यात कोरोनाची भीती दूर झाल्याचे एकंदरीत चित्र आहे. यात आता सक्रिय रुग्णांचा विचार केल्यास पाचोरा - ३, भडगाव, यावल, बोदवड प्रत्येकी ५, धरणगाव ६, मुक्ताईनगर ७, एरंडोल ८, जामनेर १०, चाळीसगाव ११, रावेर १३, पारोळा १४, चोपडा २१, अमळनेर ३५, भुसावळ ५७ आणि जळगाव २०७ असे सक्रिय रुग्ण आहेत.
सात नागरिक विदेशातून परतले
कोरोनाच्या नवीन स्ट्रेन आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विदेशातून येणाऱ्यांवर आता विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यात या कालावधीत सात प्रवासी विदेशातून परतले आहेत. यासह एरंडोलमध्ये ब्रिटनमधून एक कुटुंब परतले आहे. यावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून असून पुढील २८ दिवसांत यांना लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी करून बाधित आढळून आल्यास त्यांचा एक स्वॅब हा पुणे येथे पाठविण्यात येणार आहे.
पावणेचार लाखांवर चाचण्या
जिल्ह्यात कोरोनाच्या ३,८५,८४२ चाचण्या झालेल्या आहेत. सरासरी दोन हजार चाचण्या रोज होत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी हे प्रमाण घटले होते. त्यात शासनाच्या नव्या निर्देशानुसार चाचण्या केल्या जात आहेत. यात १,३६,८१८ आरटीपीसीआर, २,४९,०२४ ॲण्टीजेन चाचण्या झालेल्या आहेत.
कोविड सेंटरही बंद
जिल्ह्यात सहा खासगी कोविड सेंटर उघडण्यात आले होते. मात्र, रुग्ण घटल्याने ते बंद करण्यात आले आहेत. तर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका इमारतीत आता केवळ नऊ रुग्ण दाखल आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या कमीअधिक होत आहे. या ठिकाणी ८७४ बेडची व्यवस्था आहे.