कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी : हातगाडीवाले, दुकानदारांनाही मास्कचे वावडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेले ठिकाण म्हणजे शहरातील बाजारपेठा असून, खरेदीसाठी येणारे ग्राहक आणि विक्रेते अशा प्रत्येक दहापैकी सहाजण हे विनामास्क वावरत असल्याचे गंभीर चित्र गुरूवारी येथील बाजारपेठेत पाहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे यावेळी त्यांना दंड ठोठवायला किंवा सूचना द्यायला एकही प्रशासकीय कर्मचारी त्याठिकाणी नव्हता. त्यामुळे शहरातील विविध भागातून एकवटणारी व नियम न पाळणारी गर्दीच कोरोनाला निमंत्रण देत आहे.
शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता हा संसर्ग रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रूपये दंड ठोठावण्यासह काही कडक आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुधवारी दिले आहेत. मात्र, गुरूवारी बाजारपेठेत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता, अत्यंत गंभीर चित्र बघायला मिळाले.
कोठे काय होते
- टॉवर चौक ते गांधी मार्केटपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या फूल, चहा, फळविक्रेते हे विनामास्क होते. एका दुकानावर चार-चार लोक अगदी जवळजवळ विनामास्क बसलेले होते.
- सुभाष चौकाच्या अगदी मधोमध ५० मीटरच्या आत सात लोटगाड्या होत्या. यात द्राक्षे, चिकू विकले जात होते. सातपैकी केवळ दोन विक्रेत्यांनी रुमाल बांधला होता. तिघांनी तो मानेवर लटकवला होता तर दोघांनी नाका-तोंडाला काहीच बांधलेले नव्हते.
- एक पोलीस कर्मचारी याठिकाणी गाड्या हटवत होता. मात्र, मास्क लावण्याबाबत कुठल्याही सूचना देत नव्हता. या कर्मचाऱ्याने स्वत:ही मास्क अर्धवट लावलेला होता.
- गाडीवर गर्दी होत होती. बाजारात फिरणाऱ्या दहापैकी केवळ चारच लोकांनी मास्क लावले होते.
- सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला होता.
- सुभाष चौकातील दुकानदारांपैकी दोन ते तीन दुकानदारांनीच मास्क लावले होते.
- अनेकांनी रुमाल व मास्क लावला होता मात्र तो तोंडाच्या खाली सरकवलेला होता.
एटीएममध्ये फज्जा
गोंविदा रिक्षा स्टॉपवरील एका एटीएमवर दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली होती. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा लवलेशही नव्हता.
बाजारपेठेत अधिक धोका का?
१ शहरातील सर्व ठिकाणचे नागरिक याठिकाणी एकवटतात.
२ कोण बाधित आहे, याची कोणालाही कल्पना नसते.
३ याठिकाणी गर्दी टाळणे अशक्य असते.
४ विक्रेते आणि ग्राहक हे एकमेकांच्या अगदी जवळून संपर्कात येतात. शिवाय मास्कचा अनेकांना विसर पडलेला असतो.
बाजारात जाताय काय कराल?
१ अत्यावश्यक असेल तरच बाजारात जा.
२ बाजारात जाताना मास्क व्यवस्थित नाक व तोंड झाकेल, असा लावा.
३ गर्दी टाळा, जिथे गर्दी दिसेल तिथे न जाता गर्दी नसलेल्या दुकानात जा, पर्याय नसेल तर थोडे बाजूला थांबून नंतर खरेदी करा. सर्वांशी बोलताना सुरक्षित अंतर ठेवा.
४ बाजार झाल्यानंतर हात धुतल्याशिवाय नाका, तोंडाला, डोळ्याला लावू नका.
५ घरी आल्यावर हात, चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
मास्क कसे सुरक्षित?
बाधित व्यक्ती आपल्या जवळ येऊन संवाद साधत असल्यास, शिंकल्यास, खोकल्यास ते पार्टीकल आपल्या नाका-तोंडात जावून कोरोनाचा संसर्ग होतो. अशावेळी आपण किमान ट्रीपल लेअर मास्क परिधान केले असल्यास हे पार्टीकल मास्कच्या बाहेर अडकून राहतात ते नाका-तोंडात जात नाहीत व आपण सुरक्षित राहतो.
कोट
बाजारपेठेत अर्धवट मास्क घालणाऱ्या व्यक्तिही असतात, हे असे मास्क घालणे धोक्याचे आहे. मास्क व्यवस्थित नाक व तोंड झाकले जाईल, अशा पद्धतीने लावावा, बाजारात गर्दी करू नये, एकमेकांशी दुरूनच संवाद साधावा. - डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा