बीडीओंसह सहा जणांवर
खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा
अमळनेर : महिला सरपंचावर अपहाराचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर, जि. जळगाव : मागासवर्गीय महिला सरपंचावर अपहाराचा आरोप करून त्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अमळनेरचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्यासह सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलिसांत खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अमळनेर गटविकास अधिकारी वायाळसह विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे, अनिल राणे, सदस्य राजेश गांगुर्डे , किरण शिरसाठ , मंगलाबाई सोनवणे यांचा समावेश आहे.
मठगव्हाण येथील तत्कालीन सरपंच मायाबाई प्रवीण वाघ यांनी याबाबत
फिर्याद दिली. त्या २२ फेब्रुवारी २०१८ पासून सरपंचपदाचा कारभार पाहत होत्या. त्यावेळी बीडीओंनी वैयक्तिक शौचालय बांधकाम कामाबद्दल वर्गणीच्या नावाखाली एक लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच ग्रामसेवकपद रिक्त असल्याने त्याबाबत तक्रार केली असता त्यांनी अश्लील व जातिवाचक शब्द वापरले. त्यामुळे वाघ यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.
मात्र सभापतींनी राजीनामा नामंजूर करून गटविकास अधिकारी यांची माफी
मागायला लावली. यानंतर बीडीओंनी सदस्यांना हाताशी धरून चौकशी सुरू केली. त्यासाठी दोन विस्तार अधिकारी नेमण्यात आले. या अधिकाऱ्यांनी ५० हजारांची खंडणी मागितली. नंतर आपणास अपात्र करण्यासाठी प्रस्ताव पाठविला. यानंतर सुनावणीसाठी बोलावले असता शाळा दुरुस्ती व मुलींच्या शौचालय बांधकामाबाबत ५ लाख ७७ हजार रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला. त्यावेळी आपण पदावर नव्हतो, असे वाघ यांचे म्हणणे आहे.
मागासवर्गीय असल्याने आकस बुद्धीने त्रास देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास डीवायएसपी राकेश जाधव करीत आहेत.