पारोळा : तालुक्यातील शेवगे बद्रूक येथे जोरदार पावसाने मातीचे घर पडून सहाजण मातीखाली दबल्याने जखमी झाले. ही घटना येथे २१ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. मातीच्या ढिगा-याखाली दबलेल्या सहाजणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.शेवगे बुद्रूक येथे २० जुलै रोजी रात्री मुसळदार पाऊस झाला. त्यामुळे येथील कल्पना चंद्रकांत पाटील यांचे मातीचे घर अचानकपणे कोसळले. यात कल्पना चंद्रकांत पाटील (वय ४९), सागर अशोक पाटील (१६), कविता चंद्रकांत पाटील (२१), ललित बाळू पाटील (१७), वाल्मीक चंद्रकांत पाटील (२४), छबा पाटील (७०) असे सहाजण दाबले गेले होते. त्यांना ग्रमस्थांनी बाहेर काढले. यात कल्पना चंद्रकांत पाटील या गंभीर जखमी असून, त्यांना धुळे येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमींना रुग्णवाहिकेतून नेऊन डॉ. सुनील पारोचे, प्रमोद सूर्यवंशी यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉ.योगेश साळुंखे, परिचारिका सरला पवार, डॉ.अंजली पाटील, दीपक सोनार, राजू वानखेडे आदींनी उपचार केले. सरपंच आशा पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मुलगा राकेश याला रुग्णवाहिका बोलविण्यासाठी सांगितले. तहसीलदार अनिल गवांदे यांना फोन करून माहिती दिली. घटनास्थळी तहसीलदार अनिल गावंदे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, हवालदार काशिनाथ पाटील, अनिल वाघ, मंडलाधिकारी पी.ए.पाटील, प्रदीप गांगुर्डे, शहर तलाठी निशिकांत पाटील, भैया निकम, बी.टी.पाटील आदींनी भेटी दिली.घर पडून घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंसह ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा केला.------चौकटी----ग्रामस्थांच्या तत्परतेने वाचले जीवघर कोसळण्याचा मोठा आवाज झाल्याने शेजारील महिला घरातून धावत बाहेर आली. तिने घर पडलेले पाहून आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ धावून आले. मिळेल त्या साहित्याने गावातील तरुणांनी मातीचा ढिगारा उपसत जखमींना बाहेर काढले. यावेळी मातीच्या ढिगा-याखाली कोण कुठे आहे हे समजणे कठीण होते. प्र्रथम वाल्मीक पाटील यास बाहेर काढण्यात आले. त्याने आणखी पाचजण ढिगा-याखाली असल्याचे सांगितले. तेव्हा ग्रामस्थांनी सर्वांना अलगदपणे मातीच्या बाहेर काढून सर्वांचे प्राण वाचविले. ग्रामस्थांनी वेळीच तत्परता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.----मुलगा वाल्मीक हा आईला भेटण्यासाठी आला होतावाल्मीक पाटील हा सेलवास येथे कंपनीत नोकरीला आहे. त्याची विधवा आई विधवा असून त्या वडिलांच्या आत्यांसोबत घरात होत्या. आईच्या खात्यात जमा झालेले लाल्या रोगाचे अनुदान काढून देण्यासाठी व भेटीसाठी वाल्मीक आला होता. बहीण कविता हीदेखील सासरहून आईला भेटण्यासाठी आली होती. तसेच गावातील दोन नातेवाईक वाल्मीकला भेटण्यासाठी घरी आले होते. हे सर्वजण घरात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
घर पडून ६ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 8:57 PM