ऑनलाईन लोकमत
शिरसोली, ता. जळगाव, दि. 15- पुढे जाणा:या ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणा:या डंपरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात डंपरच्या कॅबिनचा चक्काचूर झाला असून गॅस कटरने कॅबिन कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजेदरम्यान शिरसोली - वावडदा दरम्यान घडला. मिळालेल्या माहितीनुसार, नेरी, ता. जामनेर येथे वाळू खाली करून डंपर (एमएच -19, ङोड - 4736) जळगावकडे येत होते. त्यावेळी एक ट्रॅक्टर कांदा घेऊन जात असताना शिरसोली वावडदा रस्त्यावर मारुती मंदिरानजीक ट्रॅक्टरच्या पुढे कोणीतरी आल्याने ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यावेळी मागून येणारे डंपर ट्रॅक्टरवर धडकले. यामध्ये कॅबिनचा चक्काचूर होऊन त्यात चालक लक्ष्मण कोळी यांच्यासह कॅबिनमधील दीपक भगवान कोळी, प्रवीण दत्तू कोळी, अनिल सुरेश सनन्से, विठ्ठल शालीक कोळी, भगवान कोळी (सर्व रा. नेरी, ता. जामनेर) हे कॅबिनमध्ये दाबले जाऊन जखमी झाले. या वेळी जैन इरिगेशन व शिरसोली येथील प्रमोद मिस्तरी यांचे गॅस कटर आणून त्याद्वारे कॅबिन कापण्यात आले व जखमींना बाहेर काढण्यात आले. यासाठी बापू मराठे व शंकर कोळी यांनी जेसीबीद्वारे मदत केली. ट्रॅक्टरला धडक लागल्यानंतर रस्त्याच्या कडेला कलंडले गेले मात्र त्यात पडताना ते थोडक्यात बचावले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला.