रात्रभर वीज पुरवठा खंडित : ग्रामीण भागातही ६० ते ७० ठिकाणी खांब कोसळले
जळगाव : मंगळवारी रात्री पुन्हा जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री अनेक ठिकाणी विद्युत तारा व खांब कोसळल्याच्या घटना घडल्या. या मध्ये प्रभात कॉलनीत सहा, तर प्रताप नगरात चार विद्युत खांब कोसळले असून, शहरातील निम्म्या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच शहरापाठोपाठ तालुक्यातील शिरसोली, वावडदा, फुफनगरी, चिंचोली, असोदा या भागातही अनेक सुमारे ६० ते ७० ठिकाणी खांब कोसळले असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर मंगळवारी रात्री पुन्हा शहर व ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी दिवसभर आकाश निरभ्र असतांना रात्री, मात्र साडे नऊच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. त्यानंतर काही वेळातच जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. पाऊस आणि त्यात जोरदार वारा सुरू असल्यामुळे रस्त्यावर समोर दिसेनासे झाले होते. सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी विद्युत तारा व खांब कोसळल्यामुळे मेहरूण, महाबळ, सुप्रीम कॉलनी, पिंप्राळा, मायदेवी नगर, नवीपेठ या भागात रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. तर विद्युत खांब कोसळलेल्या ठिकाणी रात्रभर वीजपुरवठा खंडित होता.
इन्फो :
२० तासांनी वीजपुरवठा सुरळीत
मंगळवारी रात्री जोरदार वाऱ्यामुळे प्रभात कॉलनीत सहा ठिकाणी विद्युत खांब कोसळले. तर प्रताप नगरात चार ठिकाणी विद्युत खांब कोसळले. खांब कोसळल्या नंतर सुदैवाने वीजपुरवठा खंडित असल्यामुळे जीवितहानी घडली नाही. खांब कोसळल्यानंतर त्या ठिकाणच्या वीज ताराही तुटल्याने महावितरण कर्मचाऱ्यांना हे मोठे काम रात्रीच करणे शक्य नव्हते. त्यामुळे बुधवारी सकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. महावितरणचे शहर कार्यालयाचे प्रभारी अभियंता राजेंद्र मार्के यांच्यासह २० ते २५ कर्मचारी या ठिकाणी काम करत होते. त्यानंतर दिवसभर विद्युत खांब व तुटलेल्या विजेच्या तारा जोडून तब्बल २० तासांनंतर बुधवारी सायंकाळी येथील वीजपुरवठा सुरळीत केल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
कोल्हे नगर व विद्युत कॉलनीतही तारांवर झाड कोसळले
प्रभात कॉलनीत व प्रताप नगरात विद्युत खांब कोसळल्याच्या घटना घडल्यानंतर, कोल्हे नगर व विद्युत कॉलनीत विद्युत तारांवरही दोन ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली. यामुळे या परिसरात रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी क्रेन मशीनच्या सहाय्याने ही झाडे हलविली. त्यानंतर नवीन तारा टाकून सायंकाळी सहा वाजता या भागातील वीजपुरवठा सुरू झाला. तसेच मेहरूण व एमआयडीसी परिसरातही अनेक ठिकाणी विद्युत तारा कोसळल्या. बुधवारी सायंकाळी या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला.