जळगाव : आपल्या कामाची दिशा योग्य असल्यास अनेक लोक जोडले जाऊन आपल्यावर विश्वास ठेवतात असे सांगून स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर, वृक्षसंवर्धन व मुलांचे शिक्षण या चार गोष्टींचे योग्य नियोजन केले तर देश नक्की महासत्ता होईल, असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. स्मशानभूमीत जांभळाची ३०० झाडे लावून वेगळा उपक्रम सुरु केल्याचे ते म्हणाले.बुधवारी केसीई सोसायटीच्या आयएमआरमध्ये ‘ग्रामीण व्यवस्थापन व अर्थकारण’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, धनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर, रस्ते सुविधा, बायोगॅस नियोजन आदी ग्राविकासाच्या सुविधांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.व्यासपीठावर केसीईचे कोषाध्यक्ष सुरेश चिरमाडे, ममुराबादच्या सरपंच व आयएमआरच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री मोरे, संचालक प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या. प्रास्ताविकात प्रा.डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी, तर सूत्रसंचालन डॉ.शमा सराफ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रणिल चौधरी याने करून दिला. अनेक गावांतील सरपंच, ग्रामसेवक तसेच जिल्हा परीषदेचे अधिकारी उपस्थित होते. भाग्यश्री मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.‘...तर जलप्रदूषण टळेल’वृक्षारोपणासंबंधी पेरे म्हणाले की, नव्या नवरीला गावात आल्यावर एक फळ झाड लावायची प्रथा आपण सुरू केली असून गावातली सगळी मुले आज ताजे फळे तोडून खातात. तसेच स्मशानात ३०० जांभळाची झाडे लावली आहेत. तिथे मुले खेळायला जातात. मृत व्यक्तीची राख नदीत टाकू नका, तर झाडे लावा व ही राख तिथे टाका, त्यामुळे जलप्रदूषण टळेल, असा सल्ला त्यांनी दिला.
स्मशानभूमीत लावली जांभळाची ३०० झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 12:45 PM