कोरोना परिणाम : प्रवाशांना तिकीट खिडकीवर तात्काळ परतावा मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातून धावणाऱ्या १४ रेल्वे ३० जून पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, या मध्ये जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असलेल्या पाच रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, स्थगित करण्यात आलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवर तिकीट दाखविल्यानंतर केव्हाही तिकीट परतावा मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
कोरोना मुळे राज्यात १५ मे पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या बाजार पेठा बंद असल्याने, याचा रेल्वेच्या प्रवाशी संख्येवरही मोठा परिणाम झाला आहे. तसेच दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणाऱ्या १४ रेल्वे गाड्या ३० जून पर्यंत स्थगित केल्या आहेत.
या गाड्यां मध्ये गाडी क्रमांक (०२१११-१२) अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२०४१-४२) नागपूर-पुणे एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२०३५-३६) पुणे- नागपूर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक(०२११७-१८) पुणे-अमरावती एक्स्प्रेस व गाडी क्रमांक( ०११३७-३८) नागपूर अहमदाबाद एक्स्प्रेस ही गाडी ३० जून पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून दोनच दिवस चालविण्याचा निर्णय घेतला असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे समजते.