२५ जून २०१३ ला आम्ही एक स्वप्न बघितलं. सामाजिक प्रश्नांवर केवळ भावनिक आवाहन न करता, अभ्यासपूर्ण उपाययोजना करणाऱ्या संस्थेची सुरुवात करण्याचं! बघता बघता या गोष्टीला सहा वर्ष पूर्ण झाली. २५ जून २०१९ला वर्धिष्णू ६ वर्षे पूर्ण करून ७ व्या वर्षात पदार्पण केले. वर्धिष्णूच्या माध्यामातून सुरु केलेला पहिला प्रकल्प म्हणजे आनंदघर. शिकण्या- शिकवण्याची प्रक्रिया आनंददायी करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. २०१४ पासून आजपर्यंत ३०० हून अधिक मुले-मुली आनंदघराच्या प्रक्रियेतून गेली. सुरुवातीच्या काळात केवळ कचरा वेचक मुलांपुरता मर्यादित असलेल्या ह्या उपक्रमात आज बाल-मजूर, आर्थिक दुर्बल घटकातील मुला-मुलींचा देखील समावेश आहे. यातल्या सुमारे २५० मुला-मुलींना मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये दाखल केले. तिथे टिकवून ठेवण्यात यशस्वी झालो. यातील १००हून अधिक मुले पूर्वी कचरा-वेचक तसेच इतर प्रकारच्या बाल-मजुरीच्या चक्रात अडकलेली होती. याचवेळी गेल्या तीन वर्षात आनंदघरातील २० मुले १०वीची परीक्षा पास झाली. आज ती पुढील शिक्षण घेत आहेत. आज ३ आनंदघरात १२५ हून अधिक मुलं-मुली दररोज शिकत आहेत. साधारण चार वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर आॅगस्ट २०१८ला आम्ही आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना (मुख्यत: आनंदघरात शिकणाºया मुलांच्या महिला पालक) शाश्वत रोजगार देण्यासाठी सक्षम उपक्रम सुरु केला. थोड्याच कालावधीत सक्षमने उत्तम पकड घेतली असून केवळ ९ महिन्यातच जवळपास ५ लाखाच्या उत्पन्नाचा टप्प्या गाठला आहे. वर्धिष्णूच्या वाटचालीत २०१९ ते २०२१ अशी तीन वर्षे हि महत्वाची असतील.-अव्दैत दंडवते, वर्धिष्णू परिवार.
आनंद घरची सहा वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 1:21 PM