नागरिकांचा टी आकाराला विरोध : तर नगरसेवक दारकुंडे आग्रही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - गेल्या दोन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे शिवाजीनगर भागातील नागरिकांसह जळगाव तालुक्यातील नागरिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. एकीकडे या पुलाचे काम संथगतीने सुरू असताना दुसरीकडे या पुलाच्या आकारावरून पुन्हा राजकारण पेटले आहे. शिवाजीनगर आतील काही नागरिकांच्या विरोधानंतर या पुलाचे काम पूर्वीप्रमाणेच ' एल' आकारात सुरू आहे. मात्र, या भागातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी या पुलाचे काम डिझाईननुसार' टी ' आकारात करण्यात यावे, अशी मागणी केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाची मुदत संपल्यामुळे या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुलाचे काम सुरू होण्याआधीच पुलाच्या आकारावरून शिवाजीनगर भागातील नागरिकांचा विरोध कायम होता. शिवाजीनगर भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या टी आकाराच्या डिझाईनला विरोध होता, तसेच या पुलाचे काम वाय किंवा एल आकारात करण्यात यावे, अशी मागणी शिवाजीनगरातील रहिवाशांनी केली होती. मात्र, नागरिकांच्या विरोधानंतरदेखील या पुलाचे डिझाईन टी आकारानुसारच करण्यात आले. मात्र, भविष्यात वाद निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाला सुरुवात केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच म्हणजेच एल आकारातच या पुलाचे काम सुरू केले. सद्यस्थितीत या पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, आता स्थानिक नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मंगळवारी या पुलाचे काम टी आकारातच करण्यात यावे म्हणून प्रस्तावित पुलाच्या ठिकाणावर होणारे भुयारी गटार योजनेचे कामदेखील थांबविले होते. दरम्यान, नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या मागणीला शिवाजीनगर आतील काही नागरिकांनी विरोध केला आहे. सद्यस्थितीत होत असलेल्या पुलाला शिवाजीनगरातील रहिवाशांचा पाठिंबा आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी शिवाजीनगर आतील नागरिकांच्या मागणीनुसारच या पुलाचे काम होत असून, पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असताना नवनाथ दारकुंडे यांचा विरोध का होत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच संबंधित नगरसेवकांनी ठेकेदाराकडून याबाबत रक्कम घेतली आहे का? असाही आरोप दीपककुमार गुप्ता यांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे.
नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न - नवनाथ दारकुंडे
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम हे डिझाईननुसार टी आकराचे मंजूर झाले आहे. त्यानुसारच हे काम करण्यात यावे याबाबत आपण आग्रही असून, काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिवाजीनगरातील रहिवाशांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवाजीनगर आतील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे. सद्यस्थितीत तयार होत असलेल्या पुलामुळे शिवाजीनगर आतील रहिवाशांना मोठा फेरा पडणार आहे. तसेच रेल्वे प्रशासनाकडून तहसील कार्यालयाकडून येणारा रस्तादेखील बंद करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत या भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी कानळदा रस्त्याकडून फिरून यावे लागेल, यासाठी आपला आग्रह डिझाईननुसारच व टी आकारातच हा पूल व्हावा, अशी मागणी दारकुंडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
विद्युत खांब स्थलांतर करण्याचे कामही रखडले
एकीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या आकारावरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे, या पुलालगत असलेल्या महावितरणच्या विद्युत कामांचे स्थलांतरण अद्यापही झालेले नाही. महापालिकेने २५ कोटी रुपयांच्या निधीतून शिल्लक असलेल्या १ कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर केला आहे. याबाबतचा ठराव महापालिकेच्या महासभेतदेखील मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अजूनही विद्युत खांब स्थलांतरित करण्यात आलेले नाहीत. विद्युत खांब स्थलांतरित करण्याची प्रक्रिया रखडल्याने पुलाचे कामही रखडले आहे.