लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामीण भागातील युवा वर्गाचा कौशल्य विकास व्हावा यासाठी त्यांना या विषयी धडे देण्यासह विविध विषयांवर जनजागृती करण्याचे काम नेहरु युवा केंद्राच्यावतीने केेले जात आहे. यात जिल्ह्यात १५ ब्लॉकच्या माध्यमातून हे काम सुरू असून यासाठी युवकांचाही पुढाकार वाढत आहे.
केंद्र सरकारच्या युवा व खेळ मंत्रालयाच्यावतीने नेहरू युवा केंद्राचे कामकाज केले जात असून युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी १९८७मध्ये या केंद्राची स्थापना करण्यात आली. देशभरातील ६२३ जिल्ह्यांमध्ये हे केंद्र असून यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यात १५ ब्लॉक व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकी दोन असे ३२ स्वयंसेवक या माध्यमातून काम करीत आहेत.
जास्तीत जास्त युवा स्वयंसेवकांची फळी उभारुन विकसनशील परिसर, झोपडपट्टी, ग्रामीण भागात युवक गट स्थापन व युवकांना जोडणे यासाठी नेहरु युवा केंद्राचे कामकाज चालते. या माध्यमातून कौशल्य विकास व्हावा, यासाठी युवकांना जोडले जाते. तसेच युवकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यासह सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन युवकांमध्ये सांस्कृतिक व क्रीडा भाव निर्माण करण्याचे काम केले जात आहे.
केंद्रात दोन वर्षांसाठी स्वयंसेवकांची निवड केली जाते. सध्या नवीन उमेदवारांची निवड केली जात असून ३२ स्वयंसेवकांना या माध्यमातून संधी दिली जाणार आहे. या निवडीनंतर युवांना तीन दिवसीय प्रशिक्षण दिले जाते व पुढील कामकाजाला सुरुवात होते.
नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवांसाठी काम केले जात असून यात विशेषत: ग्रामीण भागातील युवकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्ह्यात १५ ब्लॉकमध्ये काम केले जात आहे.
- नरेंद्र डागर, जिल्हा समन्वयक, नेहरू युवा केंद्र