जळगाव : जळगाव विमानतळावर मंजूर झालेले वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे प्रक्रिया सुरू झाली आहे. हे प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी निवड झालेल्या दिल्ली येथील ‘स्कायनेक्स एरिओ प्रा. लि.’ या प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी पुढील आठवड्यात जळगाव विमानतळावर पाहणी करण्यास येत असल्याची माहिती खा. उन्मेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच विमानतळाकडे येणारी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मनपा हद्दीतील तीन किलोमीटरच्या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामालाही सुरुवात झाली असून, वर्षभरात हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
जळगाव विमानतळावरील अतिथी कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेला विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष भरत अमळकर व जळगाव विमानतळाचे संचालक सुनील मगरीवार उपस्थित होते. पत्रकार परिषदेत उन्मेश पाटील यांनी सांगितले की, वैमानिक प्रशिक्षण केंद्र व हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्रामुळे जळगाव विमानतळ हे वैमानिक प्रशिक्षण हब म्हणून ओळखले जाणार आहे. यात वैमानिक प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू होणार असून, पुढील आठवड्यात ‘स्कायनेक्स एरिओ प्रा. लि.’ या प्रशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी विमानतळाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्राला सुरुवात होणार असल्याचे सांगितले.
इन्फो :
कार्गो हबसाठी परवानगी
यावेळी उन्मेश पाटील यांनी जळगाव विमानतळावरून विविध प्रकारची फळे, कृषी माल, विविध कंपन्यांचे केमिकल आदी वस्तूंच्या वाहतुकीसाठी डीजीसीएकडे पाठपुरावा केल्यावर डीजीसीएने कार्गो हबसाठी परवानगी दिली असल्याचे सांगितले. त्यामुळे जळगाव विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्यासाठी उद्योजकांच्या भेटी घेणे सुरू असून, लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
उड्डाण योजनेतूनच पुण्याची सेवा
सध्या उड्डाण योजनेंतर्गत मुंबईची विमानसेवा सुरू असून, या योजनेमुळेच सर्वसामान्यांना सध्या किफायतशीर दरात तिकीट मिळत आहे. त्यामुळे पुण्याची विमानसेवाही सर्वांना परवडेल, यासाठी उड्डाण योजनेतून सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तसा प्रस्तावही केंद्राकडे सादर केला असल्याचे उन्मेश पाटील यांनी सांगितले. तर शक्य झाल्यास आताही अनेक विमान कंपन्यांना पुण्याची सेवा देण्यासाठी तयार आहेत. मात्र, पाच ते सात हजारांच्या पुढे तिकीट राहणार असल्यामुळे ही सेवा परवडणारी नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.
धावपट्टीच्या वाढीसाठी प्रस्ताव
सध्या जळगाव विमानतळाची धावपट्टी १५०० मीटर असून, ही धावपट्टी २८०० मीटरपर्यंत करण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. केंद्राने धावपट्टीच्या या डीपीआरला तत्त्वत: मान्यता दिली आहे. लवकरच धावपट्टीच्या विस्ताराचे काम सुरू होणार असून, धावपट्टीचा विस्तार वाढल्यानंतर ‘बोईंग’सारखी मोठी विमानेही जळगाव विमानतळावर उतरणार असल्याचे उन्मेश पाटील यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पुणे विमानतळावर ‘स्लॉट’ मिळण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगितले.