लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबतचा महासभेत येणारा प्रस्ताव थांबविल्याने गाळेधारक संघटनेच्यावतीने मनपातील सत्ताधाऱ्यांचे आभार मानले आहेत. याबाबतची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. दरम्यान, आमदार सुरेश भोळे व भाजपच्या काही नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेवून गाळे प्रश्नावर आयुक्तांसोबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, गाळेधारकांनी १३ सप्टेंबर २०१९ रोजी झालेला गाळेधारकांबाबतच्या शासन निर्णयात बदल करण्यात यावा अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे. याबाबतीतच आमदार सुरेश भोळे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.अश्विन सोनवणे, धीरज सोनवणे आदी उपस्थित होते.
शासनस्तरावर बैठक घ्यावी
गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर बैठक घेण्यात यावी अशी मागणी गाळेधारकांकडून केली जात आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती गाळेधारक संघटनेकडून देण्यात आली आहे.