फत्तेपूर, ता.जामनेर : गोद्री परिमंडलातील पिंपळगाव बीटमधील वनजमिनीतील सादडा, पळस, धावडा, तिवस, सलयी अशा दोन हेक्टर वनजमिनीवरील सुमारे १९२ झाडांची अज्ञात व्यक्तींनी तोड केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकारानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या भागात दाखल झाले आहेत.गोद्री परिमंडळातील पिंपळगाव बीट मधील वनजमिनीवरील १९२ झाडांची कत्तल अज्ञात व्यक्तींनी केली आहे. १६ रोजी वनरक्षक व्ही.ए.गायकवाड हे गस्तीवर असताना ही बाब उघड झाली.त्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानुसार १७ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी एस.ए.पाटील हे वनपाल बी.व्ही.पाटील, वनरक्षक व्ही.ए. गायकवाड,एस.व्ही धनवट, जी.एस.खंदारे, एस.एम.पाटील, एस.सी.चौधरी, पी.एस.भारुडे, टी.एन.घरजाळे, व्ही.पी.काळेव घटनास्थळी हजर झाले. वृक्षतोड एकट्या व्यक्तीने नाही तर २० ते २५ जणांनी केली असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
वनरक्षक व्ही.ए.गायकवाड हे गस्तीवर असताना १६ रोजी त्यांना वृक्षतोडीचा प्रकार दिसला. त्यानंतर त्यांनी तत्काळ आम्हाला माहिती दिली. त्यानुसार वनविभागचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करून वृक्षतोड करणाऱ्यांचा शोध घेतला जाईल.-एस.ए.पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी