लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव, दि. २१ : तालुक्यात दुष्काळ सदृश्यस्थिती असल्याने त्याचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहे. २१ रोजी शनिवारी गुरांच्या बाजारावर मंदीचे सावट होते. आवक होऊनही खरेदी- विक्रीचे व्यवहार फारसे होऊ शकले नाही. चारा- पाण्याच्या झळा बसू लागल्याने पशुपालनावर याचा परिणाम होत आहे. मंदी असल्याने दरही कोसळल्याचे व्यापा-यांनी सांगितले.चाळीसगाव तालुक्यात यंदा ८६ टक्केच पाऊस झाल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके मार्च पासून जाणावू लागले आहे. याबरोबरच चारा टंचाईने डोके वर काढल्याने दावणीच्या गुरांसमोर काय ठेवायचे ? या वणव्याने पशुपालक जेरीस आले आहेत.चा-याचा प्रश्न जटील झाला आहे. त्यात पाणी टंचाईची स्थिती दिवसागणिक वाढत असल्याने पशुधन पोसणे शेतक-यांना अशक्य होऊ लागले आहे. यामुळेच शनिवारी गुरांच्या बाजारात चांगली आवक होऊनही व्यवहार मात्र तुरळक झाले. भाव नसल्याने शेतक-यांना पशुधन आल्या पावली माघारी घेऊन जावे लागले. सद्यस्थितीत तालुक्यात १४ मध्यम जलप्रकल्पात ठणठणाट आहे. विहीरी, तलाव, कुपनलिका, नद्यांमध्ये ठणठणाट आहे. त्याचा फटका पशुपालनाला बसला आहे.गुरांची आवक चांगली, व्यवहार अल्पचाळीसगावचा गुरांचा बाजार प्रसिद्ध आहे. शेजारच्या परजिल्ह्यातूनही बाजार समितीत शेतमाल व गुरे विक्रीसाठी येतात. २१ रोजी गुरांच्या बाजारात आवक चांगली होऊनही मंदी असल्याने व्यवहार नावालाच झाले. गुरांची झालेली आवक अशी : बैल - ५००, गायी - ५०, म्हैस - ६०, शेळी - १५०, मेंढी - ७०, रेडे - ९०पाणी व चारा टंचाईने मंदीचे सावटचारा - पाण्याअभावी गुरे विक्रीला आणलेल्या पशुपालकांना मंदीचाही मार सहन करावा लागला. गुरे होऊन त्यांचे पोषण कसे करायचे ? असा प्रश्न गुरे खरेदी करणा-यांनाही पडल्याने व्यवहार फारसे झाले नाही. शनिवारी गुरांचे बाजाभाव बैल १५ हजार ते ३५ हजार, गायी (जर्सी) २० हजार ते ६० हजार, गायी (गावरान) पाच हजार ते २० हजार, म्हशी (खादाड) पाच हजार ते २५ हजार, म्हशी (दुभती) २५ हजार ते ८० हजारचाळीसगाव तालुक्यात ८० हजार पशुधनशेतीपुरक व्यवसाय म्हणून तालुक्यात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. दुध व्यवसायही यामुळे शेतक-यांना तारक ठरला असला तरी, दुष्काळ सदृश्य स्थिती, ५० पैशांच्या आत असलेली पीक पैसेवारी असे प्रश्नही यंदा उभे ठाकले आहेत. तालुक्यात बैल - ४० हजार ४८६, देशी गाय - १४ हजार, संकरीत गायी - १५ हजार ९९६, म्हशी - २१ हजार ५००चा-याचे भाव कडाडलेसद्यस्थितीत ग्रामीण भागात चारा टंचाईची समस्या गंभीर आहे. परजिल्ह्यातून चारा विक्रीसाठी येत असल्याने त्याचे भाव तेजीत आहे. थेट नंदुरबार जिल्ह्यातून सुका चारा विक्रीसाठी येत असून अडीच हजार रुपये शेकडा असे चढे दर आहे. हिरवा चाराही भाव खाऊन आहे. ३०० ते ४०० रुपये शेकडा (मका, ज्वारी) अशी ऊसळी आहे. हिरव्या चा-याची तर अगोदर बुकींग करावी लागते. पहाटे पशुपालक चा-याच्या गाड्यांची वाट पाहतांना दिसतात.
बाजारात गुरांची आवक चांगली झाली. मात्र भाव न मिळाल्याने खरेदी - विक्रीचे व्यवहार फारसे झाले नाहीत. १५ रोजीच्या बाजारापेक्षा २१ रोजी आवक कमी आहे.- अशोक पाटील, प्रभारी सचिव, बाजार समिती, चाळीसगाव.