विजयकुमार सैतवालजळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि साऱ्यांचीच चिंता वाढविण्यासह लघु उद्योजकांची निराशादेखील केली आहे. पेट्रोल-डिझेलवर अबकारी कर व सेस वाढविण्यात आल्याने जळगावात पेट्रोल २.५२ रुपयांनी तर डिझेल २.५६ रुपयांनी महागले आहे. शनिवारी सकाळपासूनच हे दर लागू झाले आहेत. इंधनाच्या या भाववाढीने महागाई आणखी भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबतच सोन्यावरील सीमा शुल्कातही वाढ करण्यात आल्याने विश्वासाची गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाºया सोने खरेदीवर परिणाम होण्यासह सुवर्णनगरीतील व्यवहारांवरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत.पेट्रोल, डिझेलवर वाढविण्यात आलेल्या करामुळे महागाई वाढून सर्वांनाच फटका बसणार असल्याने मध्यमवर्गीयांसह सर्वांसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचा सूर उमटत आहे. सोबतच शेतीसह लघु उद्योगांसाठीही कोणतीच तरतूद न केल्याने या क्षेत्रातूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. या सोबतच केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्कात अडीच टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर होताच सोने ३५० रुपये प्रती तोळ््याने वाढले. सकाळी ३४ हजार ४०० रुपयांवर असलेले सोने दुपारी ३४ हजार ७५० रुपयांवर पोहचले.या पाठोपाठ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर वाढणार असल्याचे संकेत असल्याने त्यापूर्वीच केंद्र सरकारने अर्थसंकल्पात इंधनावर प्रती लीटर एक रुपया अबकारी कर व एक टक्के सेस वाढविला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव स्थिर असताना भारतात या कराच्या बोझाने इंधनात भाव वाढ झाली आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी ५ जुलै रोजी पेट्रोल जळगावात ७७.०९ रुपये तर डिझेल ६७.२६ रुपये होते. मात्र कर वाढीनंतर ६ रोजी सकाळपासून पेट्रोल ७९.६१ रुपये व डिझेल ६९.८२ रुपये झाले.सध्या करामुळे अडीच रुपयांच्यावर प्रती लिटरने इंधनाचे दर वाढले असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर दर वाढल्यानंतर या वाढत्या करानुसार भाव अधिक वाढतील व सोबतच महाराष्ट्रात पेट्रोलवर असलेला २६ टक्के व डिझेलवरील २४ टक्के मूल्यवर्धीत कराचा बोझा (व्हॅट) वाढत्या किंमतीच्या तुलनेत वाढत जातो.
सुवर्ण व्यावसायिकांसह लघु उद्योजकांची निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:27 AM