चोपडा, जि.जळगाव : शिरपूर येथील विमान प्रशिक्षण केंद्राचे विमान डोंगरावर कोसळून पायलट जागीच ठार तर महिला प्रशिक्षणार्थी जखमी झाली आहे. तिच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. ही थरारक घटना वर्डी, ता. चोपडानजीक शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
नुरुल अमीन (२८, रा. जेसी नगर, बंगळुरू) असे या ठार झालेल्या पायलटचे नाव आहे. तर अंशिका लखन गुजर (२४, रा. परिहार, खरगोन) असे जखमी प्रशिक्षणार्थी तरुणीचे नाव आहे.
दुर्घटनाग्रस्त विमान हे शिरपूर एव्हीएशन कंपनीचे टू सीटर विमान होते. या छोट्या विमानात पायलट नुरुल अमीन आणि प्रशिक्षणार्थी अंशिका गुजर
असे दोन जण होते. घटना घडली त्यावेळी अंशिका ही विमान चालवित होती. हे विमान चोपड्यापासून दहा किमी अंतरावरील वर्डी गावाजवळील सातपुडा पर्वतरांगात असताना अचानक विमानाचा पंखा तुटला. त्यामुळे हे विमान समोरच्या ध्वज बरडी डोंगरावर जाऊन आदळले. नंतर जवळपास ५० फूट खोली दरीत जाऊन कोसळले.
मोठा आवाज झाल्याने काही अंतरावर असलेल्या झोपडीमधील लोक तिकडे धावले. त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत जखमी अंशिका हिला बाहरे काढले. जखमी अंशिका हिला लागलीच चोपडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करण्यात आले. तिथून तिला शिरपूर येथे आणण्यात आले.
दरम्यान, शिरपूर येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे प्रशासक राहुल दंदे आणि नरेंद्र जैन हे घटना घडल्यानंतर काही वेळातच चोपड्यात पोहचले. जखमी अंशिका गुजर हिला उपचारासाठी मुंबईला नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.