जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगातील ध्रुव चरणाचा आपण विचार करणार आहोत. ज्यामध्ये संत तुकाराम महाराजांना एकांत हा सुखकर आणि रुचकर वाटतो, त्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केलंय ‘नाही गुण दोष अंगा येत’.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाउनच्या काळात विश्वातील लोक चार भिंतीच्या आत बंद झाले आहेत. धावपळीच्या युगात जगणाऱ्या काही लोकांना जरी हे बंदिस्त जीवन कंटाळवाणे वाटत असले तरी साधकाच्या दृष्टिकोनातून मात्र हा पर्वकाळ आहे. त्यांना ही एक साधनेसाठी मिळालेली सुवर्णसंधी आहे. कारण लोकांतात राहून ज्या गोष्टी घडत नाही त्या एकांतात घडतात.काळ सारावा चिंतने ‘एकांतवासे गंगास्नाने’’तुका म्हणे आम्हा एकांताचा वास’ ब्रम्ही ब्रम्हरस सेवू सदा ।।तुकाराम महाराज म्हणतात, लोकांमध्ये राहून कदाचित एखाद्यातील चांगली कला पाहून मन त्या गुणांकडे आकर्षित होईल. एखादा नास्तिक असला तर त्याला एखाद्यातील दोष आत्मसात करण्याची इच्छा होईल. परंतु एकांतात राहिल्यानंतर जनसंपर्कच नसल्यामुळे ना कुणाचे गुण दिसणार, ना कुणाचे दोष. कधी कधी तर संत महात्मे स्वत:ला वेगळं ठेवण्यासाठी स्वत:चा अधिकार व मोठेपणा बाजूला ठेऊन सामान्यत्व दाखवतात.चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, जगामाजी!जगे अवज्ञाच करावी, संबंधी सोय न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु!गर्भवती मातेने जेवण केल्यानंतर त्या गभार्तील जीवाला वेगळे जेवण करण्याची गरज नसते, त्याची तृप्ती आपोआप होते. त्याप्रमाणे संत वचन मानल्याने भगवंत सुखावतो, भगवंताचीच सेवा घडते.-मंगेश महाराज, दाताळा
येणे सुखे रूचे एकांताचा वास...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 12:50 PM