कोणी गेलंय की मी श्रद्धांजली अर्पण करते आहे? साहित्यिक दिवाकर काका चौधरी तर शाळेपासून लिहिता वाचता यायला लागल्यापासून डांभुर्णीच्या सगळ्यांना माहीत होते. मग मी कशी अपवाद असणार? निवेदिताची मैत्रीण म्हणून तर त्यांची सर्वात लाडकी. पहिला कवितासंग्रह जो अजून प्रकाशित झाला नाही तो मी त्यांना अर्पण केला आहे. मी काही लिहिले म्हटल्यावर गावातले सगळे सवंगडी दिवाकर सरांना दाखवले का, असेच विचारत होते. तर असे काका आता नाहीत हे वास्तव पचवू शकत नाही. नाही म्हणायला त्यांनी जे शिकवलं त्या रूपाने ते आमच्यात सतत असणार.सकाळी सकाळी जेव्हा बाबांचा फोन आला तेव्हा त्यांनी दिवाकर काका वारल्याची दु:खद घटना सांगितली. ते म्हटले की तुझा काका गेला बाई. लहानपणी मी त्यांच्याकडे खूप वेळ असायची आणि त्यासाठी बोलणी खायची. कदाचित त्यांना ते आठवलं असावं.सगळे गावकरी त्यांना दिवाकर सर म्हणत आणि घाबरत असत, पण आम्हाला कधी त्यांची भीती वाटली नाही. कारण त्यांचे वागणे इतके हसत खेळत असायचे. सगळ्या लोकांनी काही म्हटले तरी आमचे काका उत्तम शिक्षक आणि खूप चांगला माणूस होता एवढे मात्र खरे.मुलींनी सगळ्या गोष्टी शिकायला हव्या असा त्यांचा कटाक्ष असे. खेळ, नाटक, सिनेमा, नृत्य आणि वाचन वेळ मिळाला की थोडा अभ्यास पण करा, असे ते हसत खेळत सांगायचे. खूप खेळकर वातावरण असायचे, नव्हे ते निर्माण करायचे. मी कविता लिहिते म्हटल्यावर तर खूप आनंद झाला होता ते डोळ्यातले कौतुकास्पद हास्य कसे का मृत होईल? ती प्रेरणा सतत माझ्यासोबत राहील. शाळेपासून तर लग्न होईपर्यंत.. अगदी जवळजवळ प्रत्येक मुलगी असे म्हणेल जी डांभुर्णीच्या शाळेत शिकली आहे. नंतरच्या साहित्यिक गप्पा. माझी श्रद्धापेक्षा नंतर मैत्री होत गेली.दिवाकर काका म्हटले की लहानपणीचा प्रत्येक दिवस आठवत जातो. पूर्वी हा प्रश्र्न पडायचा नाही, पण आजकाल पडायला लागला होता. त्यांच्या वयाचे त्या काळी शिकलेले सगळे आपले पांढरपेशे झाले. यांनी मात्र डांभुर्णी निवडलं. फक्त डांभुर्णी निवडलं एवढंच नाही तर सामान्य जगणं निवडलं. अगदी एस.टी.ने प्रवास वगैरे. असं का? असा प्रश्न मी एकदा विचारला होता. तेव्हा गालात हसत तूच विचार करून सांग, असे म्हटले होते. काका बंधुप्रेमामुळे तुम्ही स्वत:च्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष केले खरं ना? संगातिणची (निवेदिता त्यांची मुलगी माझी मैत्रीण आहे) वकिली करते का म्हणून हसले. लहानपणी आम्हाला कुठे जायचे असेल तर आम्ही अशी एकमेकींची वकिली करायचो आणि त्यांना ते कळून जायचे मग खूप धमाल यायची.एक हाडाचे शिक्षक ज्यांची कधी भीती वाटायची नाही. सिनेमाची कथा तर इतकी उत्कृष्ट सांगायचे की अजूनही तो सिनेमा आला की मला त्यांनी सांगितलेली कथाच जास्त रंजक वाटायची. आता ही जळगावला गेले की त्यांना भेटायची उत्सुकता असायची. माझं पहिलं पुस्तक त्यांना दिले तेव्हा ते म्हणाले की, मला माहीत होते तू लिहिणार. पण इतका उशीर का केलास? आता तू बोलायचं मी ऐकणार. अनुताईला (कल्पना काकू ) किती त्रास देता हो, असं म्हटल होतं एकदा. तेव्हा कौतुकाने हसत म्हटले पोरी शिकवायला लागल्या म्हणजे आपण म्हातारे झालो. बरोबर सोनवणे काका होते. आपण शिकवलेल्या गोष्टी कुठे तरी रुजता आहे असे वाटले असावे. शाळेतील वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जाणाऱ्या विषयात असे बंडखोर प्रागतिक विचारांचे मंथन व्हायचे. कधी तरी हे आठवले की, कळतं की त्यांनी डांभुर्णी का निवडले असावे.इतक्या आठवणी आहेत की थांबतच नाही. त्यामुळे ते आमच्यातून निघून गेले असे कसे म्हणता येईल. त्यांची मानसकन्या असण्याचे भाग्य लाभले म्हणू की ते आता नाहीत हे वास्तव पचवू अशी दुहेरी मनस्थिती आहे. तो दारापर्यंत सोडायला येताना डोक्यावर ठेवलेला थरथरता हात आणि कौतुकास्पद नजर नसणार एवढे मात्र पचवायला जड जाते आहे.-सरला भिरुड
हसत-खेळत वागणारा माणूस : दिवाकर श्रावण चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 3:02 PM