जळगाव महापालिकेत सुमारे दोन महिन्यांपूर्वी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करीत त्यांचे ५७ पैकी २७ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने सत्ता मिळविली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर पालिकेतही भाजपचे नगरसेवक शिवसेनेने गळाला लावले, तर आता जळगाव महापालिकेत भाजपच्या उर्वरित ३० पैकी आणखी तीन नगरसेवकांना गळाला लावत त्यांना शिवबंधन बांधले आहे. भाजपने केंद्र व राज्यातील सत्तेच्या जिवावर मनपातील सत्ता मिळविण्यासाठी जे केले, त्याच मार्गाने शिवसेना जाताना दिसत आहे. फरक एवढाच की भाजपने साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच आयुधांचा त्यासाठी वापर केला, तर सेना विकासकामे या गोंडस नावाखाली नगरसेवक गळाला लावत आहेत. मात्र, भाजपने जी आश्वासने दिली होती, त्याची पूर्तता न केल्यानेच हे नगरसेवक सेनेकडे आले आहेत. त्यामुळे सेनेने शब्द पाळला नाही तर भाजपप्रमाणेच सेनेचीही गत व्हायला वेळ लागणार नाही.
जळगाव पालिका व महापालिकेवर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सातत्याने सत्ता होती. अगदी २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी सुरेशदादा जळगावात नसतानाही भाजपलाही महापालिका जिंकणे शक्य झाले नव्हते. त्यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपकडून ही महापालिका जिंकण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, तरीही ते शक्य झाले नव्हते. मात्र, मागील निवडणुकीवेळी केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने भाजपने महापालिका जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. त्यासाठी खान्देश विकास आघाडी म्हणजेच सेनेकडील व राष्ट्रवादीकडील निवडून येण्याची क्षमता असलेले जेवढे उमेदवार गळाला लागतील, त्या सगळ्यांना गळाला लावण्यात आले. अगदी खाविआचे महापौरही भाजपच्या गळाला लागले. यासाठी भाजपने साम, दाम, दंड भेद सगळ्यांचा वापर केला. तसेच केंद्र व राज्यात सत्ता असल्याने भाजपची सत्ता आली तर विकासकामे वेगाने होतील, असेही चित्र निर्माण केले. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तर सुभाष चौकातील जाहीर सभेत भाजपला मनपाची सत्ता दिली, तर जळगाव शहराचा एका वर्षात कायापालट करून दाखवू, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मत मागण्यासाठी येणार नाही, अशी घोषणा करीत आमदार भोळे यांची आमदारकी पणाला लावून टाकली होती. मात्र, वर्ष काय तीन वर्ष होत आली तरीही शहराचा कायापालट होऊ शकला नाही. उलट रखडलेल्या अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था बिकट होऊन नागरिकांची तीव्र नाराजी निर्माण झाली. अर्थात तरीही आमदार भोळे हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले, हा भाग वेगळा. पण भाजप आश्वासन पाळू शकली नाही, हे मात्र स्पष्ट झाले. आमदार महाजन यांनी नंतर जळगाव महापालिकेतील विकासकामांबाबत वैयक्तिक लक्ष घातले नाही, तर आमदार भोळे यांना सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन चालणे जमले नाही, त्यामुळे नाराजी वाढत गेली. त्यामुळेच अवघ्या दोन-अडीच वर्षांतच भाजपला सत्ता गमाविण्याची वेळ आली. आता सेनेने विकासकामे करण्याचे आमिष दाखवीत भाजपचे नगरसेवक गळाला लावले आहेत. मात्र, साधा शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे खांब स्थलांतरित करण्याचा विषय महिनोंमहिने रखडत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने रस्त्यांची कामे ठप्प आहेत. अशा परिस्थितीत विकासकामे करण्याचे आश्वासन पाळणे सेनेलाही अवघड जाणार आहे. त्यातच सेनेतही अंतर्गत चढाओढ सुरू असल्याने सेनेने आश्वासन न पाळल्यास भाजपसारखीच स्थिती व्हायला वेळ लागणार नाही, हे स्पष्ट आहे.