जळगाव : जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेपर्यंत आतापर्यंत १८० बसेस्च्या माध्यमातून ३ हजार ६६२ कामगार, मजूर यांना रवाना करण्यात आले आहे. एसटी बसमार्फत त्यांची रवानगी करण्यापूर्वी या प्रवाशांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात आल्याची माहिती एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली.जळगाव जिल्ह्यात लॉकडाउनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आवश्यक ती कार्यवाही व खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार संबंधित तालुक्यांचे तहसीलदार यांनी पायी जाणाऱ्या मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांतील मजुरांना बससेवा उपलब्ध करून दिली. या नागरिकांना फूड पॅकेट देऊन रवाना करण्यात आले. तत्पूर्वी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, आरोग्य तपासणी, मास्कचा वापर या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.जळगाव हा जिल्हा मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने लॉकडाउनमध्ये अडकलेले हजारो मजूर या जिल्ह्यात आलेले होते. शासनाच्या निर्णयानुसार या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी आतापर्यंत एसटी महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील विविध आगारातून १८० बसेस् सोडण्यात आल्या. यामध्ये चोरवड या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेपर्यंत १५६ बसेस्, देवरी या छत्तीसगड राज्याच्या सीमेपर्यंत २३ बसेस् व दिलोरा या तेलंगणा राज्याच्या सीमेपर्यंत १ बस याप्रमाणे गेल्या पाच दिवसात १८० बसेस्मधून ३ हजार ६६२ प्रवासी या राज्यांच्या सीमेपर्यंत रवाना करण्यात आले. १४ मे रोजी एका दिवसात मध्यप्रदेशसाठी १४ बसेस्मधून ३११ तर छत्तीसगडसाठी ५ बसेस्मधून १११ प्रवासी रवाना करण्यात आले.
तीन राज्यांच्या सीमांपर्यंत आतापर्यंत १८० बसेस्मधून ३६६२ प्रवासी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 12:49 PM