लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची वाढते आकडेवारी बघता प्रशासन लॉकडाऊनचा गांभिर्याने विचार करत आहे. मात्र सध्या चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्ण संख्यादेखील वाढली आहे. तसेच पॉझिटिव्हिटी रेट हा १२ ते १५ टक्क्यांच्या मध्ये आहे. काही दिवस आधी हाच दर २० टक्क्यांपर्यंत होता. त्यामुळे आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देतांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, होळी संदर्भात शासनाचे जे काही नियम लागू करण्यात आले आहेत. त्याचे पालन नागरिकांनी करावे. तसेच गेल्या काही दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहता प्रशासन गांभिर्याने लॉकडाऊनचा विचार करत आहे. मात्र त्यासाठी नागरिकांना पूर्वसूचनादेखील दिली जाईल.’
जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले की, सध्या चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला सुमारे दहा टक्के पॉझिटिव्हिटी येत आहे. गेल्या काही दिवसांपासून विषाणूत बदल झालेले आढळून येतात. त्यामुळे जी लक्षणे समोर येत आहेत. त्यावर जनरल प्रॅक्टिशनरलादेखील सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्ण संख्येनुसार जिल्ह्यात बेड मॅनेजमेंटचा मुद्दा आहे. त्यात जे डॉक्टर रुग्णाला संदर्भीत करत आहेत. त्यांनी त्या आधी इतर रुग्णालयांमध्ये खात्री करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑक्सिजन टँक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्याचा तुटवडा होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. औषधांच्या किमतीदेखील अवास्तव वाढवल्या जाणार नाही आणि त्याची साठेबाजी होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत आहे.
खासगी रुग्णालयांचे होणार ऑडिट
मागील काळात कोविड रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आले होते. त्यात ज्यांनी जास्त बिले वसूल केली होती. त्यांच्याकडून रुग्णांना पैसे परत दिले गेले होते. आता देखील रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आले आहे. रुग्णांना अवास्तव बिल आकारले जाऊ नये यासाठी लवकरच सॉफ्टवेअरदेखील तयार होईल, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागूदेखील करण्यात आले आहे.