विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या नियमावलीत वाङ्मय चौर्याचे काही टप्पे नमूद करण्यात आले आहेत. शून्य ते दहा टक्के हा समानतेचा स्तर समजला जातो. यामध्ये संशोधनात थोड्याफार प्रमाणात समानता असल्याने दंड आकारला जात नाही. पहिला स्तर दहा ते चाळीस टक्के समजला जातो. यात दहा ते चाळीस टक्के संशोधनात समानता असली तर संशोधकाला पुन्हा नव्याने संशेाधनाचा नवा प्रबंध सादर करावा लागतो. त्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली जाते. त्यानंतर मात्र मुदतवाढ दिली जात नाही. दुसऱ्या स्तरात चाळीस ते साठ टक्क्यांपर्यंत वाङ्मय चौर्य आढळले तर संशोधकाला एक वर्ष आपला प्रबंध सादर करण्यावर बंदी घातली जाते. तसेच त्याने शोध निबंध प्रकाशित केले असतील तर ते मागे घ्यावे लागतात. याशिवाय नोकरीवर असलेल्याला एक वार्षिक वेतनवाढ नाकारली जाते. तसेच एम.फील आणि पीएच.डी.च्या संशोधकांना दोन वर्ष मार्गदर्शन करता येत नाही. तिसऱ्या स्तरात साठ टक्क्यांपेक्षा अधिक वाङ्मय चौर्य आढळून आल्यास संबंधिताची संशोधन मान्यता रद्द केली जाते. शोधनिबंध मागे घ्यावा लागतो. याशिवाय पुढील तीन वर्षांसाठी एफ.फील. पीएच.डी. संशोधकांना मार्गदर्शन करता येत नाही. आणि दोन वार्षिक वेतनवाढीपासून मुकावे लागते.
तिसऱ्या स्तराची चोरी करणाऱ्या व्यक्तीने जर पुन्हा पुनरावृत्ती केली तर त्या व्यक्तीच्या नोकरीवर गदा पडते. एखाद्या संशोधकाला वाङ्मय चौर्य सिध्द होण्याआधी कोणतेही लाभ प्राप्त झालेले असतील तर ते काही कालावधीसाठी स्थगित केले जातात. वाङ्मय चौर्याचेदेखील काही प्रकार आढळून आलेले आहेत. यामध्ये जाणून बुजून केलेले वाङ्मय चौर्य, चौर्यकर्मातील शब्दांचे पर्याय, आशयाचे चौर्यकर्म, संदर्भाचे चौर्यकर्म, जोडणी चौर्यकर्म, मोजके वाड़मय चौर्य, अपघाती वाड़मय चौर्य, अयोग्य लेखकत्व आणि आपल्या स्वत:च्या कामाची प्रत वापरणे आदींचा समावेश आहे.
चोरी कोणतीही असो ती गंभीर आहे. त्यातही वाङ्मय चौर्य हे तर नैतिकदृष्ट्या अधिकच गंभीर आहे. बहुसंख्य विद्यापीठांनी आपल्या पातळीवर या चोरीला आळा बसण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी आपला पीएच.डी.चा शेाध प्रबंध सादर केल्यानंतर प्लेजेरिअम सॉफ्टवेअरव्दारे विद्यापीठात तपासणी केली जाते. त्यामुळे काही प्रमाणात वाङ्मय चौर्याला आळा बसला आहे.
प्रा. जितेंद्र नाईक