ऑनलाईन लोकमत/अशोक परदेशी
भडगाव, दि.27 - आजच्या धावपळीच्या युगात अनेकदा माणसाला विस्मरण होताना दिसते. मात्र कनाशी येथील एक तरुणाची जणू कॉम्प्युटराईज्ड मेमरी असून त्याचे गाव परिसरातील शेकडो लोकांचे वाहन क्रमांक संबंधितांच्या नावासह तोंडपाठ आहे. असा हा एक स्वत: हाय मेमरीकार्ड असलेला तालुक्यातील कनाशी येथील समाधान भगवान पाटील (वय 18) परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
हा विद्यार्थी चक्क तालुक्यासह इतर ठिकाणच्याही राजकीय पदाधिकारी, अधिकारी, नागरिकांचे वाहनांचे नंबर क्षणार्धात तोंडीपाठ सांगतो. समाधान भगवान पाटील हा विद्यार्थी भडगाव येथील सु.गि. पाटील विद्यालयात अकरावी कला शाखेचे शिक्षण घेत आहे. समाधानला वाचनासोबतच सुरुवातीपासून गावासह परिसरात राजकीय सभा ऐकण्याची आवड आहे. समाधाने एखादे वाहन पाहिले की तो वाहनाच्या नंबर प्लेटवरील नंबर अचूक लक्षात ठेवतो. मोटारसायकल, फोर व्हीलर, जेसीबी मशीन यांचे नंबर तो तोंडीपाठ सांगतो, विशेष म्हणजे भडगाव पंचायत समितीच्या आवारात झालेले प्रात्यक्षिकाने सा:यांचे मन जिंकून घेतले. त्याने भडगाव, चाळीसगाव, पाचोरा येथील आजी -माजी आमदार, खासदार, पंचायत समितीचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, काही अधिकारी, शेतक:यांचे वाहनांचे नंबर तोंडीपाठ सांगितल्याने उपस्थित सारेच अवाक झाले. यावेळी हर्षल पाटील, विजय पाटील, लोण पिराचे राजेंद्र सोनवणे निंभोरा यासह काही नागरिक हजर होते. कनाशी गावातही चौका चौकात हा किस्सा पहायला मिळतो. समाधानच्या या गुणवत्तेची सर्वत्र चर्चा रंगत असते.
. अशी व्यक्ती एखादीच
तल्लख स्मरणशक्ती असलेली व्यक्ती एखादीच असते. हे गुण निसर्गत:च असतात. समाधानसाठी ही परमेश्वराची देणगी मानावी लागले. प्रयत्न पूर्वकही स्मरणशक्ती वाढवता येत, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता पाटील यांनी सांगितले.