मनपाच्या कारवाईचा निषेध : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील गाळेधारकांचे अनोखे आंदोलन
आंबेडकर मार्केटमधील गाळेधारकांचा सवाल :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे आधीच गाळेधारकांचा व्यवसाय दहा टक्क्यांवर आला आहे. त्यात मनपाने गाळेभाडे व दंड आकारून लाखोंचे गाळेभाडे आकारल्यामुळे व्यापाऱ्यांमधून तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील गाळेधारकांनी ''किडनी विकून गाळेभाडे भरायचे का? असा प्रश्न उपस्थित करून मनपाच्या कारवाई विरोधात अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
शहरातील १६ व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांनी बेमुदत संप पुकारला आहे. मनपाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी दररोज वेगवेगळ्या मार्केट मधील गाळेधारकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
शुक्रवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील गाळेधारकांनी ''आमचा जीव घेण्याऐवजी किडनी घ्या, किडनी विकणे आहे, अशा प्रकारचे हातात फलक घेऊन, मनपाच्या कारवाईचा निषेध नोंदविला. या अनोख्या आंदोलनात गाळेधारक कृष्णा पाटील, युवराज वाघ, विनोद नेवे, आशिष सपकाळे, दिलीप भामरे, अजय पाटील, सत्यप्रत पाटील, नाना पवार, रत्नाकर खैरनार उपस्थित होते. गाळेधारकांतर्फे संविधानाचेही वाचन करण्यात आले.
इन्फो
चौबे मार्केटमध्ये घंटानाद आंदोलन
गाळेधारकांच्या समस्येबाबत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दुपारी रामलाल चौबे मार्केटमधील गाळेधारकानीही घंटानाद आंदोलन केले. मनपा प्रशासनाने तात्काळ आपली कारवाई मागे घेऊन, न्याय देण्याची मागणी केली. यावेळी वसीम काझी, सुनील जगताप, अमित भवनानी, सागर बारी, स्वप्निल शिनकर, विजय सोनजे, मनीष बजाज, जावेद शेख, अमित गोड, योगेश बारी, हरिहर कुंटे, बाबूलाल जैन, नीलेश महाजन आदी गळेधारक उपस्थित होते.