ममुराबाद, ता.जळगाव : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या ममुराबाद- धामणगाव रस्त्याचे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. तीन वर्षात या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होऊ शकले नाही. अर्धवट कामाला सध्या कुणीच वाली नाही.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत ममुराबाद गावाजवळील राज्यमार्ग ४२ ते धामणगाव- खापरखेडा गावापर्यंतच्या साडेचार किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. सुमारे दोन कोटी ५४ लाख ५२ हजार रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल्यानंतर त्याद्वारे जवळपास सव्वाचार किलोमीटरचे डांबरीकरण व उर्वरित रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच आठ ठिकाणी लहान मोऱ्यांचे काम व हातेड नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम त्यातून प्रस्तावित आहे. ३०ऑक्टोबर २०१८ रोजी कामाला सुरुवात होऊन वर्षभरात सदरचे काम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली होती. प्रत्यक्षात संबंधितांकडून आजतागायत या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून, डांबरीकरणासह हातेड नाल्यावरील मोठ्या पुलाचे काम करताना खूपच दिरंगाई केली जात आहे. खडीकरण झालेल्या रस्त्यावरील खडी मोठ्या प्रमाणात उखडली असून, मोऱ्यांचे बांधकाम केल्यानंतर त्याठिकाणी पाण्याचा व्यवस्थित वापर न केल्याने बहुतांश ठिकाणी मोठे तडे पडले आहेत. हातेड नाल्याजवळ फक्त वाळू आणून टाकली आहे. पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. मधल्या कमी अंतराच्या रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्यावर धामणगावसह परिसरातील खापरखेड्याच्या नागरिकांचा मोठा फेरा वाचू शकणार आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सदर रस्ता पूर्ण होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेनेही धामणगाव रस्त्याच्या अर्धवट कामाकडे सोयीस्कर डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
------------------------------
जिल्हाधिकाऱ्यांचा रस्त्यासाठी पत्र व्यवहार
प्रस्तावित धामणगाव रस्त्यालगत भारतीय खाद्य निगम (एफसीआय) अंतर्गत एका खासगी संस्थेच्या माध्यमातून मोठी धान्य गोदामे उभारण्यात आली आहेत. याठिकाणी साठविण्यात आलेल्या धान्याचे जिल्हाभरातील रेशन दुकानांना वितरण केले जाते. मात्र, धामणगाव रस्ता कच्चा व एकेरी असल्याने विशेषतः पावसाळ्यात गोदामांपर्यंत अवजड वाहने पोहोचणे जिकिरीचे होऊन जाते. बऱ्याचवेळा वाहने चिखलात फसतात. प्रसंगी वाहन उलटल्यामुळे अन्नधान्याची नासाडी होते. तसेच उचल थांबल्याने धान्य पुरवठ्यात अडचणी येतात. ही स्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी नुकताच पत्र व्यवहार केला असून, त्याद्वारे धामणगाव रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची सूचना दिली आहे.
--------------------------------------
फोटो कॅप्शन
१) ममुराबाद- धामणगाव रस्त्याचे काम अर्धवट सोडून देण्यात आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जाड खडी उखडली आहे.
२) धामणगाव रस्त्यावरील मोऱ्यांची कामे खूपच निकृष्ट दर्जाची असून, बांधकामाला मोठे तडे पडले आहेत. (जितेंद्र पाटील)