लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वास्को निजामुद्दीन एक्स्प्रेमध्ये अवघ्या १२ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करून, तिला रेल्वेतूनच फेकून दिल्याचा प्रकार सातारा येथे मंगळवारी मध्यरात्री घडला. यातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास जीआरपी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावून जळगावातून अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील पकडलेला आरोपी हा झाशी येथे सैन्य दलात कार्यरत आहे.
१२ वर्षीय पीडिता ही आपल्या आई-वडिलांसोबत गोवा एक्स्प्रेसने दिल्लीला जात होती. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत ही गाडी आली असताना आरोपीने १२ वर्षाच्या या मुलीला उचलून बाथरूममध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या मुलीने आरडाओरड केली असता, या आरोपीने मुलीला सातारा जिल्ह्यातील लोणंद गावाजवळ गाडीच्या खाली फेकले. सकाळी गावातील नागरिकांना ही मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देऊन त्या मुलीला सातारा जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दखल केले आहे.
इन्फो :
आरोपीच्या जळगाव रेल्वे स्टेशनवरून आवळल्या मुसक्या
या पीडित मुलीने अत्याचार करणाऱ्या नराधमाचे वर्णन पोलिसांना सांगितल्यानंतर पुणे रेल्वे लोहमार्गाचे अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी तातडीने तपासचक्रे फिरविली. त्यानंतर हा आरोपी गोवा एक्स्प्रेसनेच प्रवास करत असल्याचे समजल्यावर त्यांनी जळगाव रेल्वे पोलीस व जीआरपी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार जळगाव रेल्वे स्टेशनवर गाडी येताच आरोपी पळून जाऊ नये, यासाठी गाडीच्या दोन्ही बाजूला रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. त्यानंतर गाडीत जीआरपीचे पोलीस अंमलदार सचिन भावसार व आर.आर. पाटील यांनी दिलेल्या वर्णनानुसार शोध घेऊन, त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्रीच पुणे लोहमार्ग पोलीस जळगावी येऊन या आरोपीला पुण्याला नेले असल्याचे जीआरपी पोलिसांनी सांगितले.