लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : पुंछ येथे सीमेवर देशसेवा बजावत असताना बर्फवृष्टीत जखमी झालेल्या वाकडी येथील वीर जवान अमित साहेबराव पाटील ( ३३) यांची गेल्या १९ दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज बुधवारी अपयशी ठरली. उपचार सुरु असतानाच त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या निधनाच्या बातमीने वाकडी गावावर शोककळा पसरली असून आपल्या गावच्या भूमीपुत्राच्या निधनाने गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. शुक्रवारी वीर जवान अमित पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अमित पाटील हे १० वर्षापूर्वी भारतीय सीमा सुरक्षा दलात लातूर येथे भरती झाले होते. ग्वाल्हेर येथे सैन्य दलाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पश्चिम बंगाल येथे ते सीमेवर तैनात झाले. यानंतर मेघालय येथे काही वर्षे त्यांनी सेवा बजावली. जम्मू काश्मिरच्या पुंछ सीमेवर कर्तव्य बजावत असताना २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या बर्फवृष्टीत ते जखमी झाले. त्यांच्यावर गेल्या १९ दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र १६ रोजी त्यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची बातमी सकाळी साडेसहा वाजता त्यांच्या पत्नीला भ्रमणध्वनीवरुन समजली. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या.
दरम्यान, तहसिलदार अमोल मोरे यांनी कुटुंबियांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. माजी नगरसेवक शाम देशमुख व नगरसेवक शेखर देशमुख यांनी भेट घेऊन परिवाराचे सात्वंन केले. अमित पाटील यांचे शव जम्मूवरुन पुण्यात आणले जाणार असून यानंतर ते कारने वाकडी येथे आणले जाईल. शुक्रवारी दुपारनंतर त्यांच्यावर लष्करी इतमामात अत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार अमोल मोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
मंगळवारी झाले शेवटचे बोलणे
वीर जवान अमित पाटील यांनी आपण बर्फवृष्टीत जखमी झालो असून उपचार सुरु असल्याचे कुटूंबियांना कळविले होते. व्हाॅटसअॅपवर मेसेजही केला. मंगळवारी त्यांनी व्हिडीओ कॉल करुन पत्नीशी संवाद साधला. आई-वडिलांशीही बोलणे केले. गावातील काही मित्रांनादेखील त्यांनी आपल्या उपचाराची माहिती दिली. 'मी लवकरच बरा होईन. उपचार सुरु आहे. तुम्ही इकडे येऊ नका...बरा झालो की मीच वाकडी येथे येतो...' असे त्यांनी पत्नीला सांगितले. यानंतर अवघ्या काही तासात त्यांचा मृत्यू झाला.
नातूला पाहून अजोबांचा आक्रोश...
घरात अचानक जमलेली महिला आणि पुरुषांची गर्दी पाहून वीर जवान अमित पाटील यांचा पाच वर्षीय मुलगा व तीन वर्षीय मुलगी पुरती भांबावून गेली आहे. त्या गर्दीत ते सारखे विचारतात...'मम्मी कुठे आहे...' आईला ओक्साबोक्सी रडताना पाहून त्यांचे निरागस चेहरे आणखीनच कावरेबावरे होतात. आपल्या गोंडस नातवाला पाहून आजोबांना मात्र आक्रोश आवरणे कठीण झाले होते. अमित यांचे वडिल साहेबराव पाटील यांनी नातवांना जवळ घेऊन हबंरडा फोडल्याने उपस्थितांनाही हुंदका दाटून आला.