खडकदेवळा, ता. पाचोरा : गोराडखेडा येथील आयटीबीपीमध्ये कार्यरत असलेले ऋषिकेश शिवाजी पाटील हे सैनिक सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामस्थांनी संपूर्ण गावातून मिरवणूक काढून त्यांचा सपत्नीक सत्कार केला. देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती ग्रामस्थांच्या सन्मानाने फुलून आली. यावेळी भावना मोकळ्या करताना आनंदाश्रूही आले.
भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना अभिमान असतो. गोराडखेडा येथील सैनिक ऋषिकेश शिवाजी पाटील हे १५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्याचा सन्मान करण्यासाठी या जवानांची ग्रामस्थांनी संपूर्ण गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढली.
वाजत-गाजत निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढण्यासाठी सकाळीच बघता-बघता गावात सर्व ग्रामस्थ व महिला जमा झाल्या. निवृत्त जवानाच्या गणवेशात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावूक झाले. ‘भारत माता की जय’' असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही मिरवणूक निघाली. गावात मिरवणूक पोचल्यानंतर देशभक्तीच्या वातावरणात अनेक महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले.
यावेळी डाॅ. भूषण मगर, सागर गरुड, अमोल शिंदे, शिवशंभू व्याख्याते हर्षल पाटील उपस्थित होते.