जिल्ह्यात अनेक कुटुंबे आली उघड्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची दुसरी लाट तरुण जिवावरच उठली आहे. पहिल्या लाटेत सर्वाधिक मृत्यू वृद्धांचे झाले होते, तर दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू तरुणांचे झालेले आहेत. अनेक कुटुंबांत एकमेव अपत्य कोरोनाने हिरावून घेतले आहेत. वृद्धापकाळाचा आधारच गेल्याने पालकांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत दिली जात आहे. मात्र, एकमेव आधार गेलेल्या पालकांना मदत कोण करणार? असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिलेला आहे. आई-वडील मरण पावलेल्या बालकांना मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे; पण जे आई-वडीलच निराधार झाले व त्यांना कोणताही आधार नाही. उत्पन्नाचे साधन नाही किंवा वयोमानानुसार ते कामही करू शकणार नाहीत, अशा पालकांचे काय? त्यांच्यासाठी शासनाने अद्याप तरी कोणतेही धोरण आखलेले नाही.
लाॅकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाला म्हणून रिक्षाचालकांना दीड हजाराची मदत शासनाने केली. गोरगरिबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला; परंतु अतिशय गरीब कुटुंबातीलच कमावता व्यक्ती गेल्याने उघड्यावर आलेल्या माता-पित्यांना शासनाने कोणोही अर्थसाहाय्य जाहीर केलेले नाही, अर्थसाहाय्याची खरी गरज या पालकांना आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण - १४०७३३
बरे झालेले -१३४७६८
सध्या उपचार घेत असलेले -
एकूण मृत्यू -२५५०
(बॉक्स)
अख्खे कुटुंबच गेले... फक्त मुले राहिली
सावदा येथे तर आई-वडील, ज्येष्ठ काका-काकू व आजी असे अख्खे कुटुंबच कोरोनाने हिरावून घेतले. या कुटुंबात शिक्षण घेत असलेले भाऊ, बहीण यातून बचावले आहेत. पालकत्व हिरावल्याने ही मुले पोरकी झाली आहेत. एकाच महिन्यात एकाच कुटुंबात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. त्यांचा आधारच कोरोनाने हिरावून घेतला आहे.
बाॅक्स
निराधार झालेल्यांना अर्थसाहाय्याची गरज
अनेक कुटुंबांत एकमेव आधार कोरोनाने हिरावला आहे. अनेक कुटुंबांमध्ये कमावता मुलगा गेला आहे. आता या कुटुंबांना कोणीच आधार नाही. अशांना शासनाने अर्थसाहाय्य करण्याची गरज आहे. कोरोना योद्धा म्हणून ट्रेक करणारे आरोग्य कर्मचारी पोलीस व इतर फ्रंटलाइन वर्कर यांचा जीव गमावला असेल तर त्यांच्या कुटुंबाला शासनाने अर्थसाहाय्य दिले जाते. मात्र, ज्यांच्या मागे- पुढे कोणीच नाही. ते उघड्यावर आलेले आहेत अशांना शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही. शासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी जननायक फाउंडेशन या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी केली आहे.