पहूर, ता.जामनेर : येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लालफितीत रेंगाळत असल्याने हा प्रश्न मार्गी लावून पहूरकरांची तहान भागवावी व पहूरच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सोडवावा, अशा आशयाचे निवेदन पेठ ग्रुपग्रामपंचायतीकडून महाराष्ट्राचे ग्रामीण पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले.पहूर गावाचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वाघूर धरणावरून ३४ कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पेठ व कसबे ग्रामपंचायत संयुक्तिक पाणीपुरवठा समिती शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहे.तत्कालीन जलसंपदा मंत्री- आमदार गिरीश महाजन यांनी हा प्रश्न लावून धरला होता. मात्र दिलेल्या प्रस्तावात तांत्रिक त्रुटी निघाल्याने प्रस्तावाला लालफितीचा फटका बसल्याने प्रश्न प्रलंबित आहे. समितीने पुन्हा प्रस्तावात बदल करून नाशिक जीवन प्राधिकरण विभागाकडे समिती अध्यक्ष तथा माजी सभापती बाबूराव घोंगडे यांनी पाठविला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पेठ ग्रुपग्रामपंचायतच्या वतीने नीता रामेश्वर पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील यांनी दिले. तसेच पहूर रुग्णालयाला तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री आमदार गिरीश महाजन यांनी ३१ डिसेंबर २०१८ रोजी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन ५० खाटांची मंजुरी दिली आहे. मात्र हा दर्जा आजही शासनाच्या कागदावर असून रुग्णालयाचा प्रलंबित प्रश्न सोडवावा, असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे.पेठ गावात तीर्थक्षेत्र असलेल्या केवडेश्वर महादेव मंदिराजवळ ब्रीज कम बंधारा आणि जैन समाजाच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या वाघुर नदीत फरशी पुलाची मागणी या पत्राव्दारे करण्यात आली आहे. या मागण्यांविषयी मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासित केले असल्याचे सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले.
पहूरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा पाणीपुरवठा मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 2:58 PM
पहूरकरांची तहान भागवावी व पहूरच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सोडवावा, अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले.
ठळक मुद्दे पेठ ग्रामपंचायतीकडून निवेदन ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नावर आश्वासन