दोन दिवसापूर्वीच एमपीडीएच केलेल्या निखील राजपूत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, शस्त्राचा वापर व हद्दपारी आदेशाचे उल्लंघन आदी प्रकारचे ९ गुन्हे भुसावळात दाखल आहेत. त्याशिवाय भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हेही दाखल आहेत. राजपूत याला दोन वेळा हद्दपार केले होते, त्याने या आदेशाचेही उल्लंघन केले, त्यामुळे दोन गुन्हे त्याच्याविरुध्द दाखल झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारीत करताच पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले व सहकाऱ्यांना भुसावळ येथे रवाना केले होते. रात्री उशिरा कार्यवाही करुन त्याला शस्त्रधारी पोलीस बंदोबस्तात नाशिक कारागृहात रवाना करण्यात आले.शस्त्रासह भुसावळात रवाना केले. दरम्यान, जळगाव शहरातील काही गुन्हेगारांचे प्रस्ताव आधीच महानिरीक्षकांकडे परवानगीसाठी पाठविण्यात आले आहेत. एमआयडीसी व शनी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे गुन्हेगार असल्याचे संकेत मिळाले.
हद्दपारीसाठी कुंडली जमा
जळगाव, भुसावळ, रावेर व अमळनेर येथील काही गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार असून त्यासाठी या गुन्हेगारांची कुंडली काढली जात आहे. चारही शहरातून किमान ५५ च्यावर गुन्हेगार हद्दपार होतील, असा अंदाज पोलीस अधीक्षकांनी वर्तविला आहे. ग्रामपंचायत निवडणूक व आगामी काळातील काही सण, उत्सव व विविध संस्थांच्या निवडणूका पाहता कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. काही गुन्हेगारांना टोळीने हद्दपार केले जाणार असून त्यांचीही माहिती संकलित करण्याचे आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जळगाव व भुसावळ या दोन शहरातील गुन्हेगारीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे डॉ.मुंढे यांनी सांगितले.
कोट...
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलीस दलाचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच शरीराविरुध्दचे गुन्हे घडूच नये यासाठीच एमपीडीए व हद्दपारीचे शस्त्र वापरले जात आहे. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगारी खपविली जाणार नाही. गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी आपण स्वत: यात लक्ष घातले आहे. येत्या काळात नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतील.
-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक