पाठ सरळ! मान ताठ! मिस जेन..बोटं कशी धरली आहेत चहाच्या कपाभोवती? करंगळी बाहेर कशी? काय सांगितलं होतं? सारी बोटं करंगळीसुद्धा- आत वळली पाहिजे ना?’ स्वीत्ङरलडमधल्या फिनिशिंग स्कूलमध्ये वर्ग चालू होता. उमराव घराण्यातील उपवर मुली बिचा:या लक्ष देवून ऐकत होत्या. 16 वर्षाच्या झाल्या की, असल्या शाळात गृहव्यवस्थापनाचे धडे घ्यायचे. कारण चांगले स्थळ मिळवणे हे त्यांच्या आयुष्याचे एकमेव ध्येय. उच्चभ्रू ब्रिटिश समाजात चहापानाला अवाजवी महत्त्व प्राप्त झाले होते. 1662 साली पोतुर्गीज राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रगांझा ब्रिटिश राणी झाली आणि तिने राजदरबारात चहापानाची पद्धत रुजवली. स्त्रियांना चहा पिण्याची मुभा मिळाली. टी हाऊसेसमध्ये मध्यमवर्गीय बायका चहापानासाठी एकत्र जमू लागल्या. पुढे या एकत्र येण्याचा फायदा झाला. मतदानाचा हक्क, मध्यमवर्गीय बायकांना ऑफिसमध्ये काम करण्याचा हक्क मिळवण्यासाठी स्त्रियांची एकजूट झाली. चहामुळे अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाले. जग बदलण्याच्या प्रक्रियेत ह्या पेयाने आश्चर्यकारक भूमिका बजावली आहे. अमेरिका ही एकेकाळी ब्रिटिश वसाहत होती. तिच्यावर सत्ता ब्रिटिश पार्लमेंटची. नव्या वसाहतीची काळजी घेण्याऐवजी पार्लमेंटने नशीब काढण्यासाठी दूर गेलेल्या बांधवाना पिडायला सुरुवात केली. अनेक प्रकारचा माल अजूनही घरून म्हणजे इंग्लंडमधून आयात केला जायचा. प्रामुख्याने आयात होणा:या चहावरचे कर खूप वाढले. आधीपासून ब्रिटिश राजवटीबद्दल कुरबुरी सुरू झाल्या होत्या. स्वातंत्र्याचे विचार पसरत होते. इकडे लंडनला सरकार बेफिकीर होते. वसाहतीतील नागरिक हे दुय्यम दर्जाचे. त्यांनी आपला अधिकार मान्य केलाच पाहिजे, असे सरकारचे मत होते. चहावरील कर बेसुमार वाढला तेव्हा अमेरिकन लोक संतप्त झाले. इंग्रजांविरूद्ध वातावरण तापू लागले. तेथेही पहा स्त्रियांना असे पढवले जावू लागले की, ‘तुम्ही हा शापित चहा प्याल तर सैतान तुमच्यात प्रवेश करेल आणि क्षणार्धात तुम्ही देशद्रोही ठराल.’ 1770 सालापासून चहावरून हिंसेच्या तुरळक घटना घडत होत्या, परंतु शेवटी 16 डिसेम्बर 1773 रोजी बॉस्टन बंदरात महत्त्वाची घटना घडली. ब्रिटनहून चहा भरलेली चार जहाजे बंदरात नांगरली होती. त्यातील चहा स्वीकारला, तर प्रचंड कर भरावा लागणार होता, जो स्थानिक अमेरिकन प्रशासनाला अमान्य होता. सॅम्युएल अॅडम्स आणि त्याचा साठ सहका:यांनी चक्क जहाजांवर घुसून चहाच्या 348 पेटय़ा फोडून चहापत्ती सागराला अर्पण केली. हीच ती प्रसिद्ध ‘बॉस्टन टी पार्टी.’ 4 जुलै 1776ला अमेरिकनांनी स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. जॉन अॅडम्स हा या लढाईतला एक खंदा अमेरिकन. स्वातंत्र्याच्या घोषणापत्रावर सही करण्यास निघालेल्या जॉनने वाटेवरच्या हॉटेलात विचारले, ‘चहा मिळेल? फार थकलोय.’ तिथल्या वेट्रेसने ठामपणे नकार दिला. ‘सर, आम्ही इथे चहाचा त्याग केला आहे.’ खरोखर अमेरिकेने चहा त्याजला आणि कॉफी हे रोजचे पेय म्हणून स्वीकारले. चहाला नाकारणारा आणखी एक देश म्हणजे फ्रांस. एके काळी येथे चहाला खूप महत्त्व होते. राजा आणि राणी, सरदार आणि उमराव आणि श्रीमंत लोकांचे ते पेय होते. फ्रेंच राज्यक्रांती झाली तेव्हा फ्रेंचांनी हे पेय बुज्र्वा म्हणून नाकारले ते कायमचे.
‘चहाचे पान’ ते ‘चहापान’ प्रत्येकाने वाचावे, असे काही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 4:28 PM