अन्न हे सर्वस्व आहे, लागल्यावर खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती आणि भुकेल्या जीवाला आपल्यातील थोडे देणे ही संस्कृती़ एकिकडे अनेक निराधारांना, गरिबांना दोन वेळच जेवणही मिळणे कठीण असते आणि दुसरीकडे मोठ्या समारंभात, हॉटेल्स, कार्यक्रमांमध्ये अन्नाची सर्रास नासाडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते़ हा विरोधाभास जेव्हा दूर होईल तेव्हा एकही लहान बाळ रात्री उपाशी झोपणार नाही़ शहरातही बसस्थानक, रेल्वेस्थानक किंवा अनेक परिसरात असे गरीब, निराधार आढळतात जे रात्र उपाशीपोटी काढतात़ आपण जेव्हा अन्न वाया घालवत असतो तेव्हा फक्त या उपाशी पोटी झोपणाऱ्या या बालकांचा, निराधारांचा चेहरा डोळ्यासमोर असू द्या, अन्न फेकत असताना कोणीतरी उपाशी आहे हा विचार मनात असू द्या व या अन्नाचे मोल बाळगा़ अन्न वाचविणे ही काळाची गरज आहे़ आपण फेकलेले अन्न वाचविले तर ते दुसºयाचंी भूक भागवू शकते़ आमच्या संस्थेला अन्न पुरविणारे खरे अन्नदाता आहेत़ आम्ही केवळ पोस्टमनची भूमिका बजावत आहोत़ त्यांच्याकडून अन्न घ्यायचे व गरीब निराधारांना ते दयायचे़ अन्नासोबतच पाण्याचेही तेवढेच मोल आहे़ पाण्याच्या अगदी थेंबाथेंबाला महत्त्व आहे़ शहरातील परिस्थिती बघीतली तर ज्या ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली आहे त्या ठिकाणाहून लोक पिण्यासाठी पाणी भरतात, इतकी भीषण परिस्थिती सध्या पाहावयास मिळते़ पाण्याची साठवण करणेही काळाची गरज आहे़ लोकांपर्यंत पाणी घेऊन गेल्यास सध्या गंगाजलसारखे पाण्याचे मोल त्यांना आहे़ थेंब अन थेंब त्यांच्यासाठी अगदी महत्त्वाचा आहे़ रेन वॉटर हार्वेस्टींग ही संकल्पना प्रत्येकाने समजावून त्यावर काम करावे,-दानियाल शेख अल्लाउद्दीन, अध्यक्ष, एंजल फूड फाउंडेशन
अन्न फेकू नका कोणीतरी उपाशी आहे़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:40 PM