नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास रतन भोई हे पत्नी रत्ना, मुलगा भूषण (१३), विशाल (१०), सासरे भीमराव मांगो भोई व सासू लक्ष्मीबाई अशांसह ब्रुक बॉंड कॉलनीत भाड्याच्या घरात वास्तव्याला असून महामार्गावर अग्रवाल चौकात चहा, नाश्त्याची हातगाडी लावतात, त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तर सासऱ्यांनीही पलीकडे चार दिवसांपूर्वीच रसवंती सुरू केली होती. सासऱ्यांना मुलगा नाही, रत्ना ही एकच मुलगी असल्याने ते देखील यांच्यातच वास्तव्याला होते.
आजी-आजोबा बँकेतून आले अन् भूषण घरी गेला
भूषण याचे आजी,आजेाबा दुपारी बँकेत गेले होते. सोबत भूषण देखील होता. तेथून आल्यावर सर्व जण चहाच्या हातगाडीवर गेले. तेथे त्याची आई रत्ना होती तर वडील नशिराबाद येथे गेले होते. थोडा वेळ थांबल्यानंतर घराची चावी घेऊन आजी, आजोबांना सांगून भूषण हा घरी गेला. दुपारी एक वाजता आजी घरी गेली असता आतून दरवाजा बंद होता. आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आजी पुन्हा चहाच्या दुकानावर आली. तेथे भूषण हा दरवाजा उघडत नाही व आवाज पण देत नाही, असे सांगितले. त्याच्या वडिलांनाही ही माहिती देण्यात आली. ते तातडीने घरी दाखल झाले. चहाच्या दुकानाजवळून लोखंडी टॉमी घेऊन दरवाजा तोडला असता भूषण याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून वडील कैलास व आई रत्ना यांना मानसिक धक्का बसला, त्यातच चक्कर येऊन ते कोसळले. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी भूषण याला शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर रुग्णालयात अमलदार तुषार जवरे यांनी पंचनामा केला.
देवाचं वारं..अन् चिडचिड
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण हा घरात सातत्याने चिडचिड करीत होता. घरात कोणाचेच काही ऐकूनही घेत नव्हता. त्याच्या स्वभावात बदल झाल्याने देवाचं वारं असल्याचा संशय कुटुंबाला होता. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी बुधवारी वडिलांनी वेळ काढून नशिराबाद येथे मुंजोबाचं ठाणं जेथे आहे, तेथे जाण्याचा निर्णय घेऊन ते रवाना झाले आणि मागे अशी घटना घडली. चक्कर येऊन कोसळलेल्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना मूळ गावी नशिराबाद येथे पाठविण्यात आले. तेथेच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. भूषण हा विद्युत कॉलनीतील शकुंतला माध्यमिक विद्यालयात सातवीला होता. लहान भाऊ विशालदेखील याच शाळेत पाचवीला आहे.