शनिवार, दि. 26 ऑगस्ट 2017 1932 साली सोनगीर येथे पंडित परिषद झाली होती. एक गट होता सनातन पंडितांचा. वाराणसीचे पंडित लक्ष्मणशास्त्री द्रविड, राजेश्वर शास्त्री द्रविड, अनंत कृष्ण शास्त्री असा गट होता. धर्मशास्त्र आणि स्मृतीत सांगितलेल्या हिंदूंच्या चालीरीतीत कुठलाही बदल करायचा नाही, अशी ठाम भूमिका असणारा, तर दुसरा गट होता पंडित नारायणशास्त्री मराठे म्हणजे केवलानंद स्वामी आणि त्यांचे शिष्योत्तम, महामहोपाध्याय श्रीधर शास्त्री पाठक, गीता वाचस्पती सदाशिव शास्त्री सदाशिव शास्त्री भिडे (लोकमान्य टिळक यांच्या कन्येचे सुपुत्र), विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव या पंडितांचा. या वादात सनातनी गट हरला आणि दुसरा प्रागतिक विचारांचा गट विजयी झाला. याचे बरेचसे श्रेय केवलानंद स्वामी यांच्याकडे जाते. या परिषदेला चारही पिठांचे शंकराचार्य उपस्थित होते. या धर्मचर्चेतून एक नवा विचार प्रतिपादिला गेला होता. या परिषदेत अनेक धार्मिक आणि सामाजिक क्रांतिकारी निर्णय घेतले गेले होते. श्री सद्गुरू केशवदत्त महाराजांचे अंतरंग शिष्य आणि आनंदवनातील तिसरे उत्तराधिकारी महापुरुष आणि महावैष्णवोत्तम संत मधुसूदन महाराज होत. ही एक उच्चतम आध्यात्मिक विभूती असून उंची सव्वासहा फूट, भव्य देहाकृती, गौर काया, तीक्ष्ण नजर, शुभ्र पोशाख, बंडी, फेटा, उपरणे असा पेहराव. त्यांच्या भव्य व्यक्तिमत्त्वाची छाप पडायची. मितभाषी व खूप काम करणारे महाराज बहुधा नेत्रपल्लवीनेच संवाद साधत. महाराजांचे वैभव त्यांच्या लाघवी हसण्यात सामावलेले होते. महाराजांच्या दर्शनमात्रेणच सर्वसामान्य प्रापंचिक जीवांना समाधान लाभत असे. 1904 साली महाराजांचा जन्म झाला. आपल्या गुरुंवर त्यांची अपार निष्ठा, तर शिष्यावर अपार प्रेम होते. ही करुणासंपन्न माऊली थोर देशभक्तही होती. त्यांच्या ठायी अपरंपार वैराग्य, नैष्ठिक भक्ती, विलक्षण ज्ञान असा अपूर्व संयोग होता. ज्योतिष विद्येचे त्यांना ज्ञान होते पण कर्मावर श्रद्धा होती. ईशकृपा झाली तोच मुहूर्त ही त्यांची ज्ञानसाधना होती. त्यांचे सहज बोलणे हाच उपदेश होता. मुखी नित्य ‘राधे गोविंद’ वा ‘हरी हरी’ असे नामस्मरण असे. आजचे आनंदवन ही महाराजांची प्रेरणा आणि कर्तृत्व होय. त्यांनी श्री गोविंद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून सुवर्ण कळस चढवला. भक्तांच्या निवासासाठी खोल्या बांधल्या. अलौकिक कर्तृत्वाच्या सोबत हे लौकिक कार्यही महाराजांच्या हातून पार पडले. महाराज अगदी प्रसिद्धीपरा्मुख होते. देशभर आणि विदेशातही महाराजांचा शिष्य संप्रदाय विखुरलेला आहे. आपल्या देहत्यागाची वेळ महाराजांनी आधीच सांगून ठेवली होती. त्याप्रमाणे सारी पूर्वतयारी करून माघ शुद्ध नवमी दिनांक 30 जानेवारी 1895 रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्राणायामपूर्वक ध्यान लाऊन योगसाधनेद्वारा महाराजांनी नश्वर देहाचा त्याग केला. त्यांना प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा सहवास आणि दर्शन होत असे. तसे दर्शन त्यांनी अनेकांना घडवलेही होते. आनंदवनातील आनंद हेच श्रींचे दर्शन स्वरूप होय. त्यांच्या उपस्थितीमुळे हे स्थान आत्मप्रचीतीचे स्थान बनले. मधुसूदन महाराज यांचे प्रिय शिष्योत्तम डॉ.मुकुंदराज महाराज यांचा जन्म पुणे येथे 1962 साली झाला. वाणिज्य विषयातल्या पदवीधर श्री मुकुंदराज यांनी पुढे पी-एच.डी. ही संशोधनातील सर्वोच्च पदवी संपादन केली. अतिशय तलस्पर्शी प्रज्ञा, प्रत्युत्पन्न मती आणि नितांत संवेदनशील मनाचे श्री महाराज सध्या सोनगीर गादीचे प्रमुख आहेत. महाराजांचे शिक्षण पुणे येथे झाले. सद्गुरूंच्या चरणी बसून त्यांनी रामायण आणि भागवत या ग्रंथांच्या सोबतच ज्योतिष शास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. ‘भागवते विद्यावतां परीक्षा’ असे एक सूत्र आहे. भागवत हे जरी पुराण असले तरी या पुराणाच्या अध्ययनात ज्ञात्याची कसोटी लागते, अशी स्थिती आहे. या पुराणातील साधुत्त्व कालपरत्वे कसे आणि किती उपयुक्त आहे याची नित्य मीमांसा महाराजांच्या भागवत कथेचे वैशिष्टय़ आहे. महाराजांचा जागता पत्रव्यवहार आणि आता वैज्ञानिक समाज माध्यमांचाही सुयोग्य वापर करून ते सदैव अद्ययावत राहण्याचा प्रय} करतात. सातत्याने प्रवचने आणि आध्यात्मिक मेळावे घेऊन ईशजागरणाचा आपला पारंपरिक उपक्रम ते चालवतात. तुलसीदासांच्या ‘रामचरित मानस’ या ग्रंथावरील महाराजांची प्रवचने अतिशय अभ्यासपूर्ण आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी श्रुत परंपरा आहे. महाराजांचे अतिशय तरल असे मन आहे. समोरच्याशी संवाद करतानाची त्यांची भावमुद्रा सोनगीर परंपरेचे सार सर्वस्व आहे असे म्हणता येईल. महाराजांनी विविध उत्सवांच्या निमित्ताने आनंदवनाच्या सुविद्य आणि सुसेव्य परंपरांचे जतन करून ती वृद्धिंगत करण्याचे काम ते अखंडपणे करत आहेत. ‘काम करत रहा, सतत श्रींचे स्मरण करत रहा, सदैव मदत द्यायला श्री हरी अनेक रूपातून प्रकट होतो.’ हा आनंदवनचा संदेश ते देतात. या माध्यमातून आजही त्या देदीप्यमान आणि वैभवशाली परंपरेचा सुवास या परिसरात दरवळत असतो. आज चौथ्या पिढीच्याद्वारे चालणारा हा ज्ञानतज्ञ परिसरासाठी परीस ठरला आहे. यातून नव्या जागरणाचे संकेत प्राप्त होतात.
सोनगीरचे उत्तराधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 4:13 PM