लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिका प्रशासनाकडून लवकरच मुदत संपलेल्या मार्केटसह इतर मार्केटमधील एकूण १०० हून अधिक गाळ्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याआधी मनपाने जप्त केलेल्या गाळ्यांमधील साहित्याचा लिलाव मनपाकडून करण्यात येणार आहे. या साहित्याची निश्चित रक्कम काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाड्याची रक्कम वसुल करण्यासोबतच मनपाच्या ताब्यात असलेल्या गाळ्यांचा लिलाव करून, मनपाची आर्थिक स्थिती भक्कम करण्याची तयारी मनपाकडून करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मनपाकडून गाळ्यांचा लिलाव करण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतरच मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली नाही अशा गाळेधारकांवर मनपाकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जे गाळेधारक नूतनीकरणासाठी पात्र आहेत. अशा गाळेधारकांची सुनावणी प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार असून, जे गाळेधारक नूतनीकरणासाठी पात्र ठरणार नाहीत अशा गाळेधारकांच्या गाळ्यांचा लिलाव मनपा प्रशासनाकडून केला जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आयुक्त नसल्याने भंगार बाजाराचे आदेश थांबले
अजिंठा चौक परिसरातील भंगार बाजाराची मुदत संपली असून, हा बाजार ताब्यात घेण्याचा ठराव देखील महासभेत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने हा बाजार ताब्यात घेण्याबाबत संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. मात्र, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी हे मुंबईला रवाना झाल्यामुळे याबाबतचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. मनपा आयुक्त रुजू झाल्यानंतर याबाबतचे आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.