रस्ता दुरुस्तीला सुरुवात
जळगाव : अयोध्यानगरातील प्रतीक्षेत असलेला व खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागणाऱ्या रस्त्याच्या पूर्णत: दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्याच्या अगदी मधोमध अत्यंत मोठमोठे खड्डे पडलेले होते. त्यामुळे रस्ता दुरुस्त होत असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
वाहनांची गर्दी
जळगाव : संचारबंदीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई होत असताना दुसरीकडे अजिंठा चौफुलीवर दुपारी दोन वाजेच्या सुमारास अयोध्यानगरच्या गेटसमोर वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. एक मालवाहू वाहन रस्त्याच उभे राहिल्याने, शिवाय मागे अनेक वाहने असल्याने ही कोंडी झाली होती.
सारीचे मृत्यू घटले
जळगाव : जिल्हाभरात सारीच्या मृत्यूंमध्येही घट झाली असून, गुरुवारी सारी, कोविड संशयित ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ६ ते ७ मृत्यूने कमी आहे. मध्यंतरी ही संख्या १८ ते २० पर्यंत पोहोचली होती. ही संख्याही आता कोरोनाबरोबर कमी होत असल्याचे चित्र आहे.
७ नवे रुग्ण
जळगाव : इतर जिल्ह्यांतील रहिवासी असलेले मात्र, जळगावात तपासणी करून बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ होत असून, गुरुवारी असे ७ नवे रुग्ण आढळून आले असून, त्यांची इतर जिल्ह्यातील रहिवाशी अशी नोंद आहे. या रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.