लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : पाऊस लांबल्याने ६८ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २२ टक्के पेरा झाला आहे. आभाळभरोसे धूळपेरणी केलेल्या पिकांची स्थिती ठीक असली तरी, पावसाने अशीच उसंत घेतली तर ‘दुबार पेरणी’चे सावट गडद होणार आहे. मृग नक्षत्रातील दमदार पावसाची बळीराजाला प्रतीक्षा आहे. कोरडवाहू क्षेत्रासह ६८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या थांबल्या आहेत. कोरोना महामारीत आभाळमायाही बरसत नसल्याने शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यात यंदा ९० हजाराहून अधिक हेक्टरवर खरिपाची लागवड होणे अपेक्षित आहे. रोहिणी नक्षत्रावर घाई करणाऱ्या पावसाने शेतकऱ्याच्या अपेक्षा चांगल्याच उंचावल्या. ७३ मिमी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी मका, कपाशीचा धूळपेरा केला. मृग नक्षत्राच्या दमदार पावसात हा पेरा तगून जाईल हेच गणित शेतकऱ्यांचे असते. मात्र मृग नक्षत्र सुरू होऊन १२ दिवस उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडेच एकवटले आहेत. पेरणीयोग्य पाऊस नसल्याने कोरवाडवाहू क्षेत्रावरील पेरण्यांनादेखील ब्रेक लागला आहे.
चौकट
धूळपेरणीवरील सावट गडद
मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच धूळपेरणी केली जाते. यावर्षी हा पेरा चार ते पाच हजार हेक्टरवर झाला आहे. पावसाने घेतलेली उसंत या पेरणीसाठी घातक ठरणार आहे. जमिनीत काहीअंशी ओल निर्माण झाल्याने ही पिके तगून आहेत. तथापि, अजून पाऊस लांबल्यास हा पेरा जुगार ठरण्याची शक्यता आहे.
चौकट
१४ मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाट
बागायती क्षेत्रावर २२ हजार हेक्टर पेरा झाला आहे. एकूण खरीप लागवडीच्या उद्दिष्टापैकी हा पेरा केवळ २० टक्के असून ६८ टक्के क्षेत्रावरील पेरणी पावसाअभावी होऊ शकलेली नाही. १६ व १७ रोजी झालेल्या पावसाने काही अंशी बागायती पेरणीला दिलासा मिळाला असला, तरी पावसाची ओढ लांबल्यास ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.
- तालुक्यातील १४ मध्यम प्रकल्पही कोरडेठाक पडले आहेत.
- गेल्यावर्षीच्या पर्जन्यमानात देवळी-भोरस ७७ टक्के वगळता हातगाव एक व दोन, खडकीसीम, पिंप्री उंबरहोळ, ब्राह्मणशेवगे, वाघला एक व दोन, पिंपरखेड, कुंझर, बोरखेडे, वलठाण, राजदेहरे, पथराड, कृष्णपुरी व पाटबंधारे विभागातील मुंदखेडे, कोदगाव हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. मात्र सद्यस्थितीत ते शून्यावर आले आहे. त्यामुळे वाहून निघणाऱ्या कोसळधार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
- गिरणा धरणात ३२ टक्के तर मन्याड धरणातही सात टक्के जलसाठा शिल्लक आहे. १ ते २० पर्यंत १०३ मिमी पाऊस १६ व १७ रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यात सर्वाधिक बहाळ मंडळात २२ मिमी तर चाळीसगाव पाच, मेहुणबारे आठ, हातले पाच, तळेगाव दोन, शिरसगाव पाच, खडकी नऊ अशी मंडळनिहाय पावसाची नोंद महसूल विभागाने केली आहे. एक ते २० पर्यंत १०३.९६ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हे प्रमाण कमी आहे.
-मध्यंतरी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी, पेरणी योग्य पाऊस अद्याप झालेला नाही. बागायती पिकांची स्थिती चांगली आहे. कोरडवाहू क्षेत्रावरील पेरणी मात्र खोळंबली आहे. धूळपेरणीतील पिके बऱ्या स्थितीत आहे. पावसाची ओढ त्यांच्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.
-सी. डी. साठे,
तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव.
चौकट
तालुक्याचे खरीप रिपोर्ट कार्ड
एकूण लागवडीचे उद्दिष्ट ९० हजार ३८४ हेक्टर
२० अखेर पेरणी झालेले क्षेत्र २२ हजार
१ ते २० पर्यंत एकूण झालेले पर्जन्यमान १०३.९६ मिमी
पाऊस नसल्याने ६८ हजार हेक्टरवरील पेरणीला ब्रेक
१४ मध्यम प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के
गिरणा ३२ तर मन्याडमध्ये सात टक्के जलसाठा